बारामती येथे ‘नमो रोजगार मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने बारामतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित असणार आहेत. या तिघांना शरद पवारांनी त्यांच्या निवासस्थानी खास भोजनाचे निमंत्रण दिलं होतं. राजकीय वर्तुळात याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र, व्यस्ततेच्या कारणामुळे हे शक्य होणार नसल्याचं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे निमंत्रण नाकारलं आहे. या आशयाचे पत्र त्यांनी शरद पवारांना लिहंलं आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
आपले पत्र मिळाले. भोजनासाठी आपण निमंत्रित केल्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. आपण जाणताच की, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या पुढाकारातून बारामती येथे नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. बारामतीतील भरगच्च कार्यक्रम लक्षात घेता आणि तदनंतर वढू बुद्रुक आणि तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकांचे भूमिपूजन, त्यानंतर लगेचच आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन असे आणखी दोन मोठे कार्यक्रम लागोपाठ असल्याने उद्याचा संपूर्ण दिवस अत्यंत व्यस्ततेचा असणार आहे. त्यामुळे आपल्या आग्रही निमंत्रणाला मान देणे यावेळी तरी शक्य होणार नाही.
शरद पवारांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या आमंत्रणाची राजकीय वर्तुळात चर्चा होती. यामागे पवारांचा नक्कीच काहीतरी हेतू असावा, असं बोललं जात होतं. सध्या राज्यात आणि खुद्द बारामतीमध्येही शरद पवार विरुद्ध अजित पवार असा राजकीय संघर्ष सुरू आहे. बारामतीमध्ये अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार व सुप्रिया सुळे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे. फडणवीस व शिंदे हे या संघर्षात अजित पवारांच्या बाजूनं आहेत. असं असताना त्यांना आमंत्रण देऊन अजित पवारांची कोंडी करण्याचा पवारांचा डाव असल्याची चर्चा होती. हा एक प्रकारचा गुगली असल्याचंही बोललं जात होतं. मात्र, शिंदे व फडणवीसांनी हा गुगली चुकवला आहे. मुख्यमंत्र्यांनीही हे आमंत्रण नाकारल्याची चर्चा आहे.
जुलै 2023 मध्ये पवारांविरोधात उघड भूमिका घेणारे अजित पवार या भोजनाला जातात का ते पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. कारण दिवाळीनंतर पवार काका-पुतण्या समोरासमोर आलेले नाहीत. अलीकडेच अजित पवारांनी अनेकदा आपल्या काकांवर सडकून टीका देखील केलीये. त्यामुळे शिंदे, फडणवीस यांनी जर भोजनाचं निमंत्रण स्वीकारलं, तर अजित पवारही ते स्वीकारणार का ते पाहावं लागेल.

