आंबेडकरांच्या मनात पवार – ठाकरेंवर संशयच

वंचित विकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यावर भाजपची बी टाईम असल्याचा आरोप शरद पवार आणि उध्दव ठाकरेंनी कायमच केला. प्रकाश आंबेडकरांची यथेच्छ बदनामी केली. मात्र, आता ताकद कमी झाल्याने त्यांच्याच नाकदुऱ्या काढण्याची वेळ आली आहे. धर्मनिरपेक्षतेची दुहाई आंबेडकरांना दिली आहे. मात्र, आंबेडकरही कच्चा गुरुचे चेले नाहीत. शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांनीच भारतीय जनता पक्षामध्ये जाणार नाही असे लिहून द्यावे अशी मागणी त्यांनी केली.

लोकसभा जागावाटपासाठी झालेल्या एका बैठकीत वंचितने मविआतील ठाकरे गट आणि शरद पवार गटासमोर एक अट ठेवली आहे. निवडणुकीनंतर तुम्ही पुन्हा भाजप किंवा आरएसएससोबत समझोता करणार नाही, याची हमी द्या, असे वंचितने सांगितले. ठाकरे गटाच्या संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीची ही मागणी नाकारली होती. वंचित बहुजन आघाडीने आमदार जितेंद्र आव्हाड यांना लिहलेल्या जाहीर पत्रात तसा उल्लेख करण्यात आला आहे. हे पत्र सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

प्रकाश आंबेडकरांनी जितेंद्र आव्हाड यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की आपण लिहिलेले पत्र व्यक्तीगत लिहिले आहे, राष्ट्रवादीचे नेते म्हणून लिहीलेले नाही असे आम्ही समजतो. आम्ही नेहमी मानत आलो आहोत की पक्षाची असो की व्यक्तीगत, राजकारणाची भूमिका एकच असली पाहिजे. आपण या अगोदरही बीजेपीबरोबर समझोत्यामध्ये होता, आजही समझोत्यामध्ये आहात आणि यापुढे राहाल याबद्दल व्यक्तीगतरित्या खात्री आहे. परंतु, आपल्या पक्षाबद्दल ती खात्री देता येत नाही. आपल्या पक्षाचे जे प्रतिनिधी त्या बैठकीमध्ये उपस्थित होते. त्यावेळी आमच्यातर्फे जेव्हा सांगण्यात आले की, आपल्याला मतदारांना हे आश्वासित करावे लागेल की निवडणुकीनंतर आम्ही बीजेपी किंवा आरएसएसबरोबर समझोता करणार नाही. तेव्हा आपल्या पक्षाचे जे प्रतिनिधी तिथे उपस्थित होते, ते त्यावर काहीच बोलले नाहीत. ते शांत बसले आणि एका अर्थाने मौनातून त्यांनी विरोध दर्शविला. आपणच फक्त म्हणालात की “लेखी लिहून द्यायला काय हरकत आहे?” ज्या शिवसेनेला आपण सोबत घेतले आहे. त्या शिवसेनेचे प्रतिनिधी संजय राऊत यांनी उघडउघड असे लिहून देण्यास नकार दिलेला आहे.

आम्हाला खात्री करुन घ्यावी लागेल की तुम्ही निवडणूक झाल्यानंतर बीजेपीबरोबर जाणार नाहीत, याची खात्री तुम्हाला द्यावी लागेल आणि ती व्यक्तीगत नाही तर तुमच्या पक्षाला द्यावी लागेल. आपण लिहीलेले हे पत्र सोशल मीडियावर टाकले आहे का हे आम्हाला माहीत नाही. तुम्ही जर हे सोशल मीडियावर दिले नसेल तर आम्ही ही आपल्याला आश्वासित करतो की, आमचे हे पत्र सोशल मीडियावर जाणार नाही. परंतु, आपले पत्र जर सोशल मीडियावर गेले तर आमचे पत्रही सोशल मीडियावर जाईल.

आता आंबेडकर हे म्हणताहेत त्यामागे काही कारण असेल. सध्या उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेची जी वाताहत झाली आहे ती पाहता ते कदाचित मोदी- शाह यांना शरण जाऊ शकतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर मोदी- शाह त्यांना माफही करू शकतात. दुसरे म्हणजे दिशा सॅलीयन केससंदर्भात जर उद्या काही घडामोड घडल्यास आदित्य ठाकरेही अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे उध्दव ठाकरे भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेणारच नाहीत असे नाही.

शरद पवारांबाबत बोलायचे झाल्यास त्यांच्या राजकारणाचा अंदाज कोणालाही येणे कठीण आहे. २०१४ मध्ये त्यांनी न मागताच भाजपला पाठिंबा देऊन टाकला होता. शरद पवारांच्याच जुन्या सहकाऱ्यांनी माध्यमांमध्ये जी विधाने केली आहेत त्यानुसार २०१७ पासून शरद पवार पुन्हा भाजपसोबत जाण्याच्या तयारीत होते. पहाटेच्या शपथविधीला त्यांचा आशिर्वाद होता. त्यामुळे पवारांची खात्री कोणीच देऊ शकत नाही. प्रकाश आंबेडकरांच्या मनात हिच भीती आहे. उद्या जर हे दोघे भाजपसोबत गेले तर आपल्या पक्षाची विश्वासार्हताच संपून जाईल असे त्यांना वाटते. त्यामुळेच त्यांच्या मनात संशय आहे.