शरद पवार प्रकाश आंबेडकरांना का घाबरलेत?

प्रकाश आंबेडकर यांनी कायम शरद पवार यांना शाब्दिक फटके मारेल. त्यांच्यावर आरोप केले. तरीही महाविकास आघाडीत वंचित यावी यासाठी शरद पवार अगदी हतबल झाले आहेत. याचे कारण पवार धूर्त राजकारणी आहेत. आंबेडकरांची वंचित महविकास आघाडीला मोठा फटाका देऊ शकते याची त्यांना कल्पना आहे.

देशात सध्या मोदीमय वातावरण आहे. देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची साथ आहे. त्यामुळे महविकास आघाडीची लाज राहील एवढी तरी मते हवीत. वंचित सोबत नसेल तर लाज राखणेही अवघड आहे. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत सहभागी होण्याबाबत ताठर भूमिका घेणारे वंचित बहुजन आघाडीचे नेते . प्रकाश आंबेडकर या वेळी महाविकास आघाडीत येण्यास सुरुवातीपासून इच्छुक आहेत. उद्धवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादीही त्यांच्याबाबत सकारात्मक आहे. काँग्रेस नेत्यांच्या खोड्यांमुळे वंचितच्या समावेशाचा निर्णय बराच काळ लांबला.

आता तिन्ही पक्ष त्यांना सोबत घेण्यास इच्छुक असले तरी जागावाटपाच्या निर्णयावर गाडी अडली आहे. वंचित आघाडीने सुरुवातीला २७ जागांची यादी मविआच्या बैठकीत सादर केली. नंतर ८ जागांवर ते अडून बसले. आता शेवटच्या टप्यात चार जागांपर्यंत तडजोड करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. ६ मार्च रोजी शरद पवार व प्रकाश आंबेडकर यांच्या बैठकीत आणखी एखादी जागा कमी करण्याची तयारी दर्शवून वंचितचा आघाडीत समावेश होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.

२०१९ मध्ये मोदी लाट असल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीने वंचित आघाडीशी हातमिळवणीचे खूप प्रयत्न केले. मात्र त्या वेळी वंचितने आघाडीसोबत जाण्याऐवजी एमआयएमशी युती करून निवडणूक लढवण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे महाराष्ट्रात धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊन त्याचा भाजपला अप्रत्यक्ष फायदा झाला. बहुतांश मुस्लिम, दलितांची मते वंचितकडे गेली. काही मतदारसंघात तर एक ते दीड लाखांपर्यंतची मते वंचितला मिळाली. या तिहेरी लढतीत हक्काचे ७ ते ८ लोकसभा मतदारसंघ काँग्रेस व राष्ट्रवादीला गमवावे लागले होते. त्यामुळे काँग्रेसचा अवघा १ तर राष्ट्रवादीचे फक्त ४ खासदार निवडून आले होते. अशोक चव्हाण (नांदेड) व सुशीलकुमार शिंदे (सोलापूर) या दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या पराभवासही वंचित कारणीभूत ठरली होती.

प्रकाश आंबेडकरांनी या वेळी सुरुवातीपासून आघाडीत येण्यास रस दाखवला. आधी उद्धव ठाकरेंशी हातमिळवणी केली. ठाकरेंनी त्यांच्यासाठी शरद पवारांकडून एनओसी मिळवली. काँग्रेसने मात्र वंचितला वेटिंगवर ठेवले होते. आता ते तयार झाले तर जागावाटपावर गाडी अडली. सुरुवातीला वंचितने २७ जागांची यादी मविआकडे दिली. नंतर ७ ते ८ जागांपर्यंत तडजोडीची तयारी दर्शवली. पण मविआ त्यालाही तयार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वंचित आता ४ जागांपर्यंत तडजोडीस तयार झाली आहे.

अकोला मतदारसंघात स्वतः प्रकाश आंबेडकर इच्छुक आहेत. सांगलीतून पहिलवान चंद्रहार पाटील व वर्धा येथून प्रा. राजेंद्र साळुंखे यांची नावे चर्चेत आहेत. हे तीन मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत वंचितला हवे आहेत. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तर वर्धा व सांगलीतून उमेदवारीही जाहीर केली होती, मात्र प्रकाश आंबेडकरांनी त्यांना तूर्त संयम राखण्याचा सल्ला दिला आहे. आता ६ मार्च रोजीच्या बैठकीत वंचितच्या जागावाटपाचा अंतिम निर्णय होईल. हे सगळे असेल तरी आम्ही मविआत आहोत की नाही हेच मला अजून कळलेले नाही. ६ मार्च रोजी भेटू असा निरोप मला शरद पवारांकडून मिळाला आहे. पण मविआच्या बैठकीचे अद्याप मला कुठलेही निमंत्रण मिळालेले नाही. मविआत आमचा समावेश झाला नाही तरी आम्ही स्वतंत्र लढू, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. प्रकाश आंबेडकर यांचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर ते शेवटच्या क्षणीही महविकास आघाडीला सोडू शकतात. पण त्यापूर्वी तीनही पक्षांना बदनाम मात्र करतील. शरद पवार यांना हिच भीती आहे.

२०१९ मध्ये वंचितमुळे इथे आघाडीचा पराभव

नांदेड –

युतीची मते : ४,८६,८०६

आघाडीची मते :४,४६,६५८

वंचितची मते : १,६६, १९६

सोलापूर –

युतीची मते : ५,२४,९८५

आघाडीची मते : ३,६६,३७७

वंचितची मते : १,७०,००७

सांगली –

युतीची मते : ५,०८,९९५

आघाडीची मते : ३,४४,६४३

वंचितची मते : ३,००,२३४

परभणी –

युतीची मते : ५,३८,९४१

आघाडीची मते : ४,९६,७४२

वंचितची मते : १,४९,९४६

गडचिरोली –

युतीची मते : ५,१९,९६८

आघाडीची मते : ४,४२,४४२

वंचितची मते : १,११,४६८

बुलडाणा –

युतीची मते : ५,२१,९७७

आघाडीची मते : ३,८८,६९०

वंचितची मते : १,७२,६२७

हातकणंगले –

युतीची मते : ५,८५,७७६

आघाडीची मते : ४,८९,७३७

वंचितची मते : १,२३,४९९