लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांकडून गनिमी कावा आखण्यात येतोय, अशी चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील मराठा आंदोलक प्रत्येक लोकसभा मतदारसंघात किमान २५० – ३०० उमेदवार उभे करणार व सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणणार असा दावा करण्यात येतो आहे. मात्र या दाव्यात किती दम आहे आणि खरंच एवढे उमेदवार उभे केले तर त्याचं नुकसान भाजपला होईल असे बोलले जात आहे. मनोज जरांगे पाटील व त्यांच्या समर्थक आंदोलकांचा सत्ताधारी महायुतीवर राग स्पष्ट दिसून येतोय. आगामी लोकसभेत भाजपला पाडण्यासाठी हे आंदोलक गनिमी कावा करू बघत आहेत. भाजपचे उमेदवार पाडण्यासाठी जास्तीत जास्त मराठा तरुणांनी निवडणुकीत उभ राहावं असं आवाहन आंदोलक करत आहेत. मात्र निवडणुकीच गणित बघता आंदोलकांचा हा गनिमी कावा त्यांच्यावरच उलटण्याची दाट शक्यता आहे.
भाजपचं नुकसान करण्यासाठी आंदोलक जास्तीत जास्त मराठ्यांना निवडणुकीत उभे राहण्यासाठी आवाहन करत आहेत खरं पण याचा फायदा मात्र भाजपलाचं होऊ शकतो अशी चिन्हं आहेत.
एक सोप्प गणित बघायचं झाल्यास, प्रत्येक गावातून काही मराठा उमेदवार उभे राहणार. आपापल्या ओळखीतील व कार्यक्षेत्रातील मतं ते खाणार. हे मराठा उमेदवार तिचं मत खाणार जी कधी भाजपला मिळणार नव्हती, आता जी मतं भाजपला मिळणार नव्हती ती मतं स्वाभाविकपणे विरोधकांना मिळाली असती. या परिस्थितीत मराठा उमेदवार विरोधकांची मतं फोडणार म्हणजे याचा फायदा भाजपला होणार, हे स्वच्छ आणि स्पष्ट आहे.
आता मराठा आंदोलकांचा आणखी एक मुद्दा असा आहे की, जास्तं उमेदवार देऊन आम्ही निवडणूक आयोगाला बॅलेट पेपरवर निवडणूका घ्यायला भाग पाडू. पण घटनेत ३८४ पेक्षा जास्त उमेदवार झाल्यास निवडणूका बॅलेट पेपरवर घेण्याचा कुठलाही उल्लेख नाहीये. हा ती निवडणुक रद्द मात्र केली जाऊ शकते.
या परिस्थितीत सुद्धा भाजपलाच फायदा होताना दिसून येतो. एक गोष्ट तर खरी आहे की, मराठा आंदोलकांच्या आवाहनानंतर राज्यातील सर्वच लोकसभा मतदारसंघात एवढया मोठया प्रमाणावर उमेदवार उभे राहणार नाही. आंदोलकांचा प्रभाव असलेल्या मराठवाड्यात आंदोलकांची ही रणनिती सफल झाली आणि ३८४ पेक्षा जास्त उमेदवार उभे राहिले तर निवडणुक आयोग त्या मतदारसंघातील निवडणुक रद्द करुन पुढे ढकलेल.
निवडणुक काही महिन्यांनी किंवा वर्षांनी होईल. तोपर्यंत कदाचित मराठा आरक्षणाचा मुद्द निकाली निघाला असेल, भाजपने या निवडणूकीत बहुमत मिळवलं तर आपसूकच नंतर होणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला फायदा होईल व भाजपचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतील. त्यामूळे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील मराठा आंदोलक जो गनिमी कावा आखत आहेत तो खरंच परिणामकारक आहे का, हा मोठा प्रश्न आहे. ज्याचं उत्तर आपल्याला नजीकच्या काळात मिळणार आहे.
