शिवसेनेचे आमदार गुवाहाटीला होते, तेव्हाच भास्कर जाधव बॅग भरून तयार होते; योगेश कदमांचा मोठा दावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी भास्कर जाधव यांच्या संदर्भात मोठा दावा केला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे आमदार जेव्हा गुवाहाटीला होते, तेव्हाच भास्कर जाधव बॅग भरून तेथे येण्यासाठी तयार होते. मात्र, त्यावेळी आम्ही भास्कर जाधव यांना पक्षात न घेण्याबाबत भूमिका घेतली होती. भास्कर जाधव यांच्यासारखे व्यक्ती आपल्या सोबत नको, अशी भूमिका मी मांडली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी त्यांना येऊ दिले नसल्याचे, योगेश कदम यांनी म्हटले आहे.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि रामदास कदम यांचे पुत्रयोगेश कदम यांनी भास्कर जाधव यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. आम्ही गुवाहाटीला होतो तेव्हाच भास्कर जाधव देखील बॅग भरून तयार होते. ही गोष्ट सन्माननीय शिंदे साहेब, उदय सामंत साहेब आणि मला माहिती आहे. तेव्हा शिंदे साहेबांनी आम्हाला दोघांना बाजूला घेऊन विचारलं होतं की, काय करायचं भास्कर जाधव देखील यायला तयार आहेत. तेव्हा भास्कर जाधव यांच्यासारखी व्यक्ती आपल्यासोबत नको ही भूमिका आम्ही मांडली होती.

स्वतःचे कसे खरे आहे हे रेटून न्यायचे आणि पक्षांतर्गत वाद निर्माण करायचे या व्यतिरिक्त भास्कर जाधव यांना काही येत नाही, अशी टीका योगेश कदम यांनी केली. मविआ मध्ये असताना दापोली मतदारसंघ हा विकास कामांच्या बाबतीत मागे जात होता. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्व विकासकामांना गती मिळाली. महात्त्वाच्या विकास कामांचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन होत आहे, असं योगेश कमद यावेळी म्हणाले.

रामदास कदम यांनी भाजपावर काही दिवसांपूर्वी टीका केली होती. भाजपा केसाने गळा कापते, असा आरोपच कदम यांनी केला होता. या आरोपानंतर भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एक्सवर पोस्ट टाकून रामदास कदम यांना इशारा दिला होता. याबाबत योगेश कदम यांना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, या दोन मोठ्या नेत्यांमधील गोष्टी आहेत. माझ्यासारखा लहान कार्यकर्ता यामध्ये पडू इच्छित नाही.