भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना भाजपकडून बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झालीय. पण या मतदारसंघात सध्या पंकजा यांच्या बहीण प्रीतम मुंडे या खासदार आहेत. पक्षाने प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून पंकजा यांना उमेदवारी दिली आहे. भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी पंकजा यांनी आपल्या बहीणीचं तिकीट कापून आपल्याला उमेदवारी मिळाली असली तरी प्रीतम ताईला आपण विस्थापित करणार नाही, असं मोठं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या, लोकसभेसाठी माझी उमेदवारी जाहीर झाली हे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. त्यामुळे माझ्या भावना आभाराची आहे. थोडी संमिश्र भावना यासाठी आहे कारण १० वर्ष प्रीतम मुंडे खासदार होत्या. मी राज्याचं राजकारण करत होते. आता केंद्रात राजकारण करणार आहे. तसा प्रभारी म्हणून कामाचा अनुभव आला आहे. मुंडे साहेब गेल्यानंतर डॉक्टरीपेशा सोडून प्रीतम राजकारणात आल्या, गेली १० वर्ष त्या संसदेत होत्या. आमच्या दोघींमध्ये समन्वय होता. प्रीतम मुंडेंना मी विस्तारीत करणार नाही. त्या शद्बावर मी कायम आहे, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
धनंजय मुंडे हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांचा पक्ष आणि आमचा पक्ष यांची राज्यात युती आहे. त्यामुळे नैसर्गिकरित्या आम्ही जिल्ह्यात एक आहोत. धनंजय मुंडे बरोबर असल्याने प्रीतमताईंपेक्षा जास्त मताधिक्क्याने मी निवडून येईन असा विश्वास पंकजा मुंडेंनी व्यक्त केला आहे. आम्हा दोघांचाही संवाद आता वाढला आहे. धनंजय मुंडे यांच्याशी मन की बात झाली ती पत्रकारांना सांगणार नाही असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
आम्ही दोघींपैकी एकीचं नाव येईल याची खात्री होती. त्यामुळे मनात भीती असण्याचं कारण नव्हतं असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली असून, तोच सन्मान म्हणून मी स्विकार करते असंही पंकजा मुंडेंनी सांगितलं आहे. सध्या जसं नव्या नोकरीवर जाताना, लग्नासाठी बोहल्यावर चढताना वाटते तशी धाकधूक वाटत आहे असं त्या म्हणाल्या.
