राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी बारामतीमध्ये तब्बल 7 सभा घेतल्या. या सभांमधून अजित पवारांनी बारामतीकरांचं पाठबळ आपल्या पाठीशी असावं असं आवाहन मतदरांना केलं. बारामतीमधील सभेमध्ये अजित पवार यांनी थेट त्यांचे चुलते आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार यांचा उल्लेख न करता त्यांना पुन्हा एकदा वयावरुन टोला लगावला. तसेच शरद पवारांची कन्या आणि बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंनाही नक्कल करत टोला लगावला आहे.
अजित पवार यांनी काल बारामतीमध्ये एका सभेला संबोधित करताना आपले काका शरद पवार यांना जिव्हारी लागणार टोमणा मारला. “उतारवयातील लोकांनी आशिर्वाद देण्याच काम करायच असतं. काही चुकलं तर कान धरायचा असतो. फारच कंटाळा आला तर भजन करायच असतं. सध्या खूप जणांना फोन येत आहेत. खूप जणांना बोलावल जातय. भावनिक केलं जात आहे. भावनिक व्हाय़च की विकास कामांच्या मागे उभं रहायच हे तुम्ही ठरवायचय” असं अजित पवार मतदारांना म्हणाले.
अजित पवार यांनी गुरुवारी बारामती तालुक्याचा मॅरेथॉन दौरा केला. यावेळी कोऱ्हाळे बुद्रुक येथील सभेत बोलताना ते पुढे म्हणाले की, राज्यातील सहकारी साखर कारखान्यांचा दहा हजार कोटींचा आयकर मोदी-शाह यांनी माफ केला. शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम केले. दुधाला अनुदान दिले. पोलिस पाटील, आशा सेविकांचे मानधन वाढवले. साडेआठ लाख सौर कृषीपंप शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.
काहीजण तुम्हाला फोन करतील. ज्यांचा 15 वर्षात फोन आला नाही कधी नीट बोलले नाहीत ते पण फोन करतील, असं अजित पवार म्हणाले. पुढे अजित पवारांनी अगदी नाजूक आवाजात, “अरे कसा आहेस तू? बरा आहेस का? काही अडचण आहे का? मला येऊन भेट, असं सुप्रिया सुळेंना देखील टोला लगावला आहे.आपल भलं करुन घ्यायच. तालुक्याचा सर्वांगिण विकास करायचा की, तालुक्यातील विकासकामांना खीळ निर्माण करायची हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे असं अजित पवार सभेला संबोधित करताना म्हणाले.
