जयंत पाटील देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांनी जोर धरला आहे. मात्र, शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील भाजपमध्ये जातील असे दावे अनेक दिवसांपासून केले जात आहे. जयंत पाटील यांनी हे दावे वेळोवेळी खोडून देखील काढले आहेत.
भाजपाचे नेते आपल्याभोवती जाळे फेकत आहेत, असा दावा जयंत पाटील यांनी नाशिकमधील सभेत केला होता. यावर बोलताना छगन भुजबळ यांनी म्हटलं की, जयंत पाटीलच भाजपमध्ये देवेंद्र फडणवीसांसह अनेकांच्या संपर्कात आहेत. कित्येक महिन्यांपासून मी ऐकतोय आज उद्या. त्यांचं आधी फायनल होऊ द्या मग आपण ठरवू.
सर्वोच्च न्यायालयाने काल निर्देश दिले आहेत. त्यात शरद पवार यांचा फोटो वापरण्यास अजित पवार गटाला मनाई करण्यात आली आहे. यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, शरद पवारांचे फोटो दाखवून मते मिळवा असं मी कधीच म्हटलं नाही. त्यांच्यासोबत असतानाही मी कधी त्यांचा फोटो दाखवा आणि मते मिळवा असं बोललेलो नाही. चिन्हावर मतं घ्या असं सांगतो. घड्याळ चिन्ह आता आम्हाला मिळालं आहे. ते निवडणूक आयोगाने दिले आहे. आता ती वेळही आलेली नाही की, चिन्ह दाखवून प्रचार करावा. कारण अद्याप कोणत्याही निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचे दिशाभूल करण्याचे काम शरद पवार गटाकडून होत आहे असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
अद्याप कुठलीही निवडणूक आलेली नाही. निवडणूक आली तरीही आयुष्यात कुणाचा तरीही फोटो दाखवा आणि मतं द्या असं मी बोललो नाही. शिवसेनेत असतानाही बोललो नाही. राष्ट्रवादीत असतानाही बोललो नाही. निवडणुकीच्या वेळी बॅनरवर फोटो असतात ते वेगळं. निवडणुकीच्या वेळी आपण हे सांगतो की आमचं चिन्ह पाहून मत द्या. फोटो दाखवायला प्रत्येक वेळी फोटो तिथे असतो का? असाही प्रश्न छगन भुजबळ यांनी विचारला.
त्यानंतर कांद्याच्या प्रश्नावर बोलतांना ते म्हणाले की, कांद्याला शरद पवार कृषिमंत्री असताना का हमीभाव दिला नाही? शरद पवार कृषिमंत्री असताना देखील कांद्याचे भाव पडले होते. कांद्याचे दर पडले आहे आहेत ही सद्यस्थिती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
