लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्या होणार जाहीर; दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी निवडणूक आयोगाची बैठक मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली. या बैठकीत नव्याने नियुक्त झालेले निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि ज्ञानेश कुमार उपस्थित होते. या दोघांची नियुक्ती गुरुवारी झाली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी निवडणूक आयोगाची बैठक झाली. ही बैठक 40 मिनिटे चालली. या बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही निवडणूक आयुक्त सहभागी झाले होते. त्यात लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखांबाबत निर्णय घेण्यात आला.

लोकसभा निवडणुकांचे बिगुल उद्या (शनिवारी) वाजणार आहे. उद्या दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत २०२४ च्या सार्वत्रिक (लोकसभा) निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होणार आहे. देशातील ५४३ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा उद्या होणार आहे. निवडणुकांच्या घोषणांपाठोपाठ देशभरात आचारसंहिता लागू होईल. निवडणुकीच्या घोषणेकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य मतदारांचे डोळे लागून राहिले आहेत.

या घोषणेमुळे लोकसभा निवडणुकीचा राजकीय लढाईचा टप्पा निश्चित होईल. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार तिसरी टर्म जिंकण्यासाठी पर्यटन करणार आहे, तर विरोधक इंडिया आघाडी एनडीएला धक्का देण्याची आशा करत आहेत. दरम्यान, आदर्श आचारसंहिता निवडणकू घोषणा झाल्यानंतर लगेचच लागू होते, ती सुद्धा उद्याच होणार आहे.

निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही, मात्र सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. प्रचारात भाजपनं आघाडी घेतली असून पक्षाकडून लोकसभा उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील वीस उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. तर काँग्रेसने देखील आपल्या उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. मात्र त्यामध्ये महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नाहीये. अद्याप राज्यात महाविकास आघाडीतील जागा वाटपा तिढा सुटलेला नाहीये, त्यामुळे उमेदवारांची नावंही जाहीर करण्यात आलेली नाहीयेत.