‘आयुष्यभर हिंदुत्ववादी भूमिका घेऊन जगणाऱ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राला…’ आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर मुबंईतील शिवाजी पार्क मैदानावर विरोधकांची आघाडी असलेल्या इंडियाची शनिवारी पहिली सभा झाली. या सभेच्या माध्यमातून इंडियाने लोकसभा निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्ध ठाकरे यांनी या सभेत केलेल्या भाषणावरून भाजपाने टीका केली आहे. सभा एक झाली, पण प्रश्न अनेक निर्माण केले, असे मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती हल्ला चढवला. ‘ आयुष्यभर हिंदुत्ववादी भूमिका घेऊन जगणाऱ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राला सभेत जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो म्हणायलाही लाज वाटते’ अशा शब्दात उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात आली. तर “हिंदुत्वाला केले तडीपार” हे तमाम महाराष्ट्राला दाखवून देण्यासाठीच “शिवतीर्थावर” सभा घेण्यात आली होती का ? असा सवाल विचारत आशिष शेलार यांनीही उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला.

‘आपल्याच तोऱ्यात आपली सभा घेऊन… आपल्याला हवे तेवढे… शिवतीर्थावर भाषण करणारे..’ अशी सुरुवात करत शेलारांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर काही प्रश्न उपस्थित केले.

श्रीमान उध्दव ठाकरे यांना न्याय सभेत फारच केविलवाणा “न्याय” मिळाला ?, भाषणासाठी पाच मिनिटे ठरवून दिली गेली का? भाषणाची सुरुवात “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…!” अशी करण्यास बंदी घालण्यात आली होती का ?, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मारकासमोर झालेल्या सभेत सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना दोन खडे बोल “मर्दा”सारखे ऐकवण्यास कोणी मज्जाव केला होता का? असेच ते प्रश्न.

हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने “हिंदुत्वाला केले तडीपार” हे तमाम महाराष्ट्राला दाखवून देण्यासाठीच “शिवतीर्थावर” सभा घेण्यात आली होती का? सभा एक झालेय.. पण प्रश्न अनेक निर्माण करुन गेलेय.. काँग्रेसच्या हातात बाहुल्यासारखी दिली उबाठा गटाची “मशाल” आता खंजीर, वाघ, मर्द..कोथळा.. अशा काहीही फुशारक्या मारा खुशाल!!