पोलीस व नक्षलवाद्यांच्या चकमकीत गडचिरोलीत चार नक्षल्यांचा खात्मा

महाराष्ट्रातील गडचिरोलीमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मंगळवारी पहाटे चकमक सुरु झाली. या चकमकीत पोलिसांनी चार नक्षलींचा खात्मा केला आहे. पोलिसांचे सी 60 कमांडो आणि नक्षलवाद्यांमध्ये पहाटेच्या सुमारास दीड ते दोन तास चकमक झाली. या चकमकीनंतर पोलिसांना घटनास्थळी 4 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपाताचा मोठा डाव या नक्षलींनी आखला होता. पोलिसांनी हा डाव उधळून लावला. ठार झालेल्या नक्षलवाद्यांवर 36 लाखांचे बक्षीस होते.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाला मोठे यश मिळाले आहे. तेलंगणा राज्यातून घातपाताच्या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालेल्या चार नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे. अहेरी तालुक्यातील रेपनपल्लीच्या जंगलातल्या कोलामार्का टेकडी परिसरात ही चकमक झाली. गडचिरोली जिल्ह्यात घातपात करण्याच्या उद्देशाने प्राणहिता नदी ओलांडून तेलंगणा राज्यातील काही बडे नक्षल नेते गडचिरोलीत आल्याची गुप्त सूचना पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अहेरी येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या नेतृत्वात विविध नक्षलविरोधी पथके या भागात शोधमोहीमेसाठी तैनात करण्यात आली.

मागील काही दिवसांत नक्षली पुन्हा एकदा अधिकचे सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशात शहरी नक्षलवादाचा मुद्दा समोर आला असून, राज्यातील महत्वाच्या शहरातील झोपडपट्टीमधील तरुणांचे मनपरिवर्तन करून त्यांना नक्षली कारवायात ओढण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील पोलिसांच्या नक्षल विरोधी अभियानाच्या रडावर शहरी नक्षलवाद असल्याचे पाहायला मिळत आहे. तर, नक्षल समर्थक असलेल्या राज्यातील 36 संघटनांची पोलिसांकडून ओळख पटवण्यात आली आहे. तसेच त्यांच्यावर पाळत ठेवली जात आहे.

जानेवारी महिन्यातच नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली होती. गडचिरोलीची सीमा आणि छत्तीसगड राज्याला लागून असलेल्या मौजा पेरिमिलीभट्टी जंगल परिसरात, 5 नक्षलवाद्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले होते. गडचिरोली पोलीस दलातील सी 60 चे जवान नक्षलविरोधी अभियान राबवत होते. त्यावेळी नक्षलवाद्यांनी पोलिसांना जीवे मारण्याच्या उद्देशाने पोलिसांच्या दिशेनं गोळीबार केला. तेव्हा स्वसंरक्षणार्थ आणि प्रत्युत्तरादाखल जवानांनी गोळीबार केला. त्यावेळी झालेल्या चकमकीत नक्षलवादी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. परंतु सी 60 कामांडोनी त्यांना पकडले होते.