शेवटी दारूनीतीमध्ये त्याला अटक झाली; केजरीवालांच्या अटकेवर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया

आम आदमी पक्षाचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी अटक झाली आहे. दिल्ली सरकारच्या दारु धोरण प्रकरणात केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई झाली आहे. ज्यांच्यामुळे केजरीवाल मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचू शकले, त्या अण्णा हजारे यांनी केजरीवालांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी बोलत असताना अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर बोलत असताना अण्णा हजारे म्हणाले, ‘अरविंद केजरीवाल यांच्यासारखा माणूस माझ्यासोबत काम करायचा याचे मला खूप वाईट वाटते. दारूबाबत आम्ही आवाज उठवला होता, आज ते दारू धोरण बनवत आहेत. याचे मला वाईट वाटले. पण एक काय करणार, सत्तेसमोर काही चालत नाही. त्यांच्या कामामुळे त्यांना अटक करण्यात आली. जे काही होईल ते कायदेशीररित्या केले जाईल, सरकार ते बघेल, विचार करेल.’

केजरीवाल यांनी दारु धोरण तयार करण्याआधी आपण अनेकदा त्यांना पत्र लिहिलं होतं असंही अण्णा हजारे म्हणाले. “त्यांना (केजरीवाल यांना) मी पत्र लिहिलं होतं. नवीन दारु धोरण निश्चित करताना काय करावं ही तुमची जबाबदारी आहे. मात्र तुम्ही दारुबद्दल का बोलत आहात? समाजात अनेक प्रश्न आहेत. त्यावर बोला ना. दारुचं धोरण तुम्ही तयार केलं. दारु वाईट आहे हे सर्वांना ठाऊक आहे. त्याचं धोरण तयार करणं हे किती योग्य आहे? आम्ही मागील अनेक वर्षांपासून आम्ही समाजाच्या भल्यासाठी काम करत आहोत. त्यांच्या डोक्यात हे विचार कुठून आले कळत नाही,” असं अण्णा हजारे म्हणाले. “मी अनेकदा त्यांना पत्र लिहिलं. पण त्यांच्या डोक्यात मला सांगायच्या आहेत त्या गोष्टी गेल्या नाहीत आणि आज अखेर अटक झाली,” असंही ते अण्णा हजारेंनी नमूद केलं.

शेवटी त्यांनी मद्यविक्री धोरण जारी केले. शेवटी त्याच दारूनीतीमुळे त्याला अटक झाली. त्यामुळे आता तो आणि सरकार बघून घेतील. ज्यांची चूक झाली त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे, अशी रोखठोक भूमिका अण्णा हजारे यांनी घेतली.

अण्णा हजारे हे पूर्वी केजरीवाल यांचे गुरू होते. अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल आंदोलनात अरविंद केजरीवाल सर्वात पुढे होते. परंतु, आंदोलन चालू असतानाच केजरीवाल यांनी राजकारणात यायचं ठरवलं, त्यामुळे अण्णा हजारे आणि केजरीवाल यांच्यात बिनसलं. त्यानंतर या दोघांचे मार्ग बदलले. पुढे केजरीवाल यांनी आम आदमी पार्टी हा पक्ष काढला आणि आता हा पक्ष दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तेत आहे.

दिल्लीतील दारु घोटाळ्याप्रकरणी तब्बल १० समन्स दिल्यानंतर ईडीने अखेर अरविंद केजरीवाल यांना अटक केली. गुरुवारी रात्री उशिरा केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई झाली. त्यानंतर केजरीवाल यांनी अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अरविंद केजरीवाल यांनी अटकेविरोधातली याचिका मागे घेतली आहे. खालच्या कोर्टात सुनावणी होणार असल्याने ही याचिका मागे घेतल्याचं केजरीवालांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितलं आहे.