मुंबई पालिकेची मोठी कामगिरी, एकाच दिवसात तब्बल 100 कोटींची उच्चांकी वसुली

मार्चअखेर जवळ येत असल्याने महापालिकेने मालमत्ता करवसुलीचा धडाका लावला आहे. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळत असून 19 मार्च 2024 रोजी एकाच दिवसात तब्बल 100 कोटी रुपयांची विक्रमी करवसुली करण्‍यात करनिर्धारण व संकलन विभागाला यश आले आहे. करदात्‍या नागरिकांनी 31 मार्चपूर्वी करभरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

मुंबई महानगरपालिकेचा करनिर्धारण व संकलन विभाग गत वर्षभरापासून सातत्याने कर वसुलीकामी पाठपुरावा करत आहे. आर्थिक वर्ष 2023 – 2024 ची सुधारित कर देयके फेब्रुवारी 2024 अखेरीस निर्गमित झाल्यानंतर विविध प्रसार माध्यमांचा व समाज माध्‍यमांचा वापर करत नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. मालमत्ता कर न भरलेल्यांची यादी जाहीर करून मालमत्‍ताधारकांना नोटीस देणे, थकबाकीदारांना टेलिकॉलिंग, एसएमएस करणे आदींवर भर दिला जात आहे.

मालमत्ता करवाढीवरून सुरू असलेल्या घोळामुळे सन 2023 – 2024 ची बिले प्रत्यक्षात 26 फेब्रुवारीपासून पाठवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. 2023 – 2024 मध्ये सुमारे सहा हजार कोटी करवसुलीचे लक्ष्य ठेवले होते. मात्र ते शक्य होणार नसल्याने मार्चअखेरपर्यंत 4,500 कोटींचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून नागरिकांकडून करभरणा करण्यास वेग आला आहे. त्यामुळे आता मालमत्ता करापोटी दररोज ६० ते ७० कोटी रुपये तिजोरीत जमा होत आहेत. 20 मार्चपर्यंत सुमारे 1500 ते 1600 कोटी वसूल करण्यात यश आले आहे. पुढील दहा दिवसांत आणखी सुमारे तीन हजार कोटींचे लक्ष्य पूर्ण करण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे.

मालमत्ताकर वसुलीचे निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी करनिर्धारण व संकलन विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेत आहेत. मालमत्ताधारकांनी सुद्धा मालमत्ता कर भरण्यासाठी स्वतःहून पुढे यावे. थकबाकीदारांनी आपला थकीत मालमत्ता कर तसेच मालमत्‍ताधारकांनी आपला नियमित कर भरून महानगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्‍या वतीने करण्यात आले आहे.

19 मार्च 2024 ला विभागनिहाय मालमत्‍ताकर वसुली

ए विभाग – 5 कोटी 39 लाख रुपये
बी विभाग – 67 लाख 37 हजार रूपये
सी विभाग – 1 कोटी 69 लाख रूपये
डी विभाग – 6 कोटी 92 लाख
ई विभाग – 1 कोटी 63 लाख रूपये
एफ दक्षिण विभाग – 53 लाख 72 हजार रूपये
एफ उत्तर विभाग – 79 लाख 96 हजार रूपये
जी दक्षिण विभाग – 4 कोटी 44 लाख रूपये
जी उत्तर विभाग – 3 कोटी 31 लाख रूपये
एच पूर्व विभाग – 5 कोटी 72 लाख रूपये
एच पश्चिम विभाग – 5 कोटी 90 लाख रूपये
के पूर्व विभाग – 7 कोटी 72 लाख रूपये
के पश्चिम विभाग – 5 कोटी 73 लाख रूपये
पी दक्षिण विभाग – 2 कोटी 78 लाख रूपये
पी उत्तर विभाग – 3 कोटी 17 लाख रूपये
आर दक्षिण विभाग – 1 कोटी 74 लाख रूपये
आर मध्य विभाग – 2 कोटी 51 लाख रूपये
आर उत्तर विभाग – 1 कोटी 86 लाख रूपये
एल विभाग – 2 कोटी 21 लाख रूपये
एम पूर्व विभाग – 58 लाख 91 हजार रूपये
एम पश्चिम – 2 कोटी ४६ हजार
एन – 1 कोटी 26 लाख
एस – 29 कोटी 3 लाख 48 हजार
टी – 2 कोटी 37 लाख 64 हजार