अकोल्याचे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांची प्रकृती सध्या बरी नसून ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. धोत्रे सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अकोल्यातील प्रचारसभेत बोलताना धोत्रेंबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. नाना पटोले गुरुवारी (४ एप्रिल) अकोला येथील काँग्रेसच्या प्रचारसभेत म्हणाले, “खासदार संजय धोत्रे सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. परंतु, भाजपावाले निवडणुकीत त्यांचं व्हेंटिलेटर काढतील.” त्यानंतर पटोले यांनी सारवासारव करत संजय धोत्रे त्यांचे मित्र असल्याचे सांगितले. पटोले यांच्या वक्तव्यावरून वाद पेटण्याची चिन्हे असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पटोले यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काँग्रेस पक्ष एकीकडे दिल्लीत ‘न्यायपत्र’ जाहीर करतो आणि दुसरीकडे त्यांचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भर सभेत एका खासदाराच्या ‘मृत्यूची कामना’ करतात?. असंवेदनशीलतेचा हा कहर आहे. निवडणुकीत आपण विरोधक असलो तरी विरोधकांच्या मृत्यूची कामना, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्र आणि अकोल्यातील जनतेची तात्काळ माफी मागा अशी मागणी करत खा. संजय धोत्रे यांना दीर्घायुष्य लाभावे, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो असं त्यांनी ट्विटद्वारे सांगितले.
कॉंग्रेस पक्षाकडून डॉ. अभय पाटील यांना अकोलातून उमेदवारी जाहीर झाली त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ४ एप्रिल रोजी अकोला दौऱ्यावर आले होते त्यावेळी स्वराज्य भवन येथे आयोजित सभेत त्यांनी भाजपचे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांच्याबाबत वक्तव्य केलं.
अकोला लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार संजय धोत्रे हे सध्या आजारी असून त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. या मतदारसंघात भाजपाकडून संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. अकोला इथं वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर, काँग्रेस कडून अभय पाटील यांच्यासह २८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. संजय धोत्रे हे गेल्या २० वर्षापासून अकोल्याचे खासदार आहेत. १९९९ मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर २००४ पासून सातत्याने ते खासदार आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील पटोलेंच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे.”नाना, कावळ्याच्या श्रापानं गाय मरत नसते. तुम्ही भाजपविरोधात हवा तेवढा खोटा प्रचार करा, लोकांची मते मिळविण्यासाठी कुणासमोरही पायघड्या घाला. पण तुमच्या घाणेरड्या राजकारणातठी कुणाचे मरण चींतू नका. “असे म्हणत तुम्हाला ही जनता माफ करणार नाही’ असे नाना पटोलेंना ठणकावले. पुढे ते म्हणाले, की कुणाच्या मरणाची वाट बघत त्यावर पोट भरणं ही गिधाडांची वृत्ती असते. आणि केवळ मते मिळविण्यासाठी तुम्ही गिधाडांच्या वृत्तीनं वागू नका. असे वक्तव्य करत भाजपने आक्रमक पवित्रा उचलला आहे.
