शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा लवकरच भाजप प्रवेश होणार आहे. आज संध्याकाळपर्यंत प्रवेशाचा मुहूर्त निश्चित होणार असल्याची माहिती मिळत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील तसेच केंद्रीय नेतृत्वातील नेत्यांची एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेश करावा अशी विनंती करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
रक्षा खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांच्या भाजपा प्रवेशावर बोलताना म्हटले होते की, अन्य पक्षातील बडे नेते भाजपामध्ये येत आहेत. एकनाथ खडसे यांच्याबाबत मी अधिक काही सांगू शकत नाही, कारण हा वरिष्ठ पातळीवरील विषय आहे. परंतु पक्ष काय निर्णय घेतो, एकनाथ खडसे यांचं त्यावर काय मत आहे, हे पाहावं लागेल. मात्र, नक्कीच एक कार्यकर्ता म्हणून बऱ्याच लोकांची इच्छा आहे की, एकनाथ खडसे यांनी भाजपात येऊन पुन्हा कामाला सुरुवात केल्यास लोकांना आनंद होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खडसेंना अपेक्षेप्रमाणे फारकाही मिळालं नाही. पक्षात कायम मागे राहिलेल्या खडसेंच्या हाती काहीच लागलं नव्हतं. त्यातच आता ते पुन्हा स्वगृही परतणार असल्याचं बोललं जातंय. शनिवारी रात्रीच त्यांचा प्रवेश होईल, असं वृत्त ‘एबीपी माझा’ने दिलं आहे.
खडसे रविवारी अचानक राजधानीत दाखल झाले होते. त्यामुळे खडसे यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. या प्रकरणी खडसे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. पण त्यांच्या निकटवर्तीयांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. खडसे रविवारी रात्री अचानक दिल्लीला रवाना झाल्यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे शरद पवार गटाला मात्र जळगाव आणि रावेरमतदारसंघामध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे भाजपमध्ये परतणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली आहे. पण खडसे यांनी वेळोवेळी हीच चर्चा फेटाळून लावली. पण आता एकनाथ खडसे लवकरच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची तुतारी सोडून भाजपचे कमळ हातात घेणार असल्याची माहिती आहे.एकनाथ खडसे यांनी देखील आपले भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत आपले चांगले संबंध असल्याचे भाष्य केलं होते.
भाजपने लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी अनेक नेत्यांना मागील काही महिन्यांपासून पक्षात घेत आहे. त्याचप्रमाणे भाजपचे महायुतीतील मित्र पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी मध्ये देखील मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होत आहेत.अशातच उत्तर महाराष्ट्रात चांगला जनसंपर्क असलेले एकनाथ खडसे यांना सोबत घेतल्यास जळगाव आणि रावेर या दोन मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांना मोठा फायदा होईल,असा अंदाज भाजप नेतृत्वाला आहे.
