चंद्रपूर- वणी-आर्णीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य तसेच मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हात बळकट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोमवार (८ एप्रिल) चंद्रपूर येथे येणार आहेत. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाचे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना आशीर्वाद देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा चंद्रपुरात होणार आहे.
विशेष म्हणजे चंद्रपुरात तब्बल दहा वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. यावरुन आता वार- पलटवार सुरु झालेत. चंद्रपुरात मोदींनी चार सभा घ्याव्यात तरीही धानोरकरच निवडणूक येणार असं संजय राऊत म्हणालेत. त्यावर मुनंगटीवारांनी उत्तर दिलंय. मुनगंटीवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराचा नारळ चंद्रपूर मधून फोडत आहेत. राज्याची पहिली सभा वाघाच्या भूमीत होतं आहे त्यामुळे आपला विजय निश्चित आहे. संजय राऊत यांना मुंबईत बसून, दिव्य दृष्टी येते. ते काहीही बोलू शकतात. मंत्रालयात न येता सरकार चालवणारे काय आव्हान देणार अशी टीका केली. लोक मोदीजींना मतदान करतील हा विश्वास आहे.
तब्बल दहा वर्षांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपुरात येत आहेत. मोदींची सभा चंद्रपूर भाजपसाठी नेहमीच लकी ठरली आहे. २०१४ च्या लोकसभेचे भाजपचे उमेदवार हंसराज अहिर यांच्या प्रचारार्थ मोदींची सभा चंद्रपुरात झाली होती. तेव्हा मोठ्या मताधिक्याने हंसराज अहिर यांचा विजय झाला होता.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आज सोमवार (ता. ८ एप्रिल) रोजी महायुतीच्या प्रचारासाठी विदर्भात येत आहे. भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार सुनील मेंढे व वर्धा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ भंडारा व हिंगणघाट येथे त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
