मनसेचा गुढीपाडवा मेळावा आणि लोकसभा निवडणुका असं समीकरण जुळून आल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज काय बोलणार? कोणती भूमिका घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 2014 आणि 2019 या दोन्ही लोकसभा निवडणुकीत मनसेने आपले उमेदवार मैदानात उतरवले नव्हते. 2024 लोकसभा निवडणुकीसंदर्भात राज ठाकरेंनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. पण महायुतीमध्ये ते सामील होणार असल्याची चर्चा आहे. राज ठाकरे यांनी दिल्लीमध्ये अमित शाह यांची नुकतीच भेट घेतली होती, त्याशिवाय देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे महायुतीला मदत करतील, असं वक्तव्य केले होते. त्यामुळे राज ठाकरे कोणती भूमिका घेणार? याची राजकीय उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
आज मनसेच्या पाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरे विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य करण्याची शक्यता आहे. गेल्या दोन महिन्यांत त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाहीर कार्यक्रमांमधून ‘पाडवा मेळाव्यात सविस्तर बोलेन’ असं सांगितलं आहे. त्यात यंदाच्या पाडवा मेळाव्याआधीच मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याचे दावे केले जात असताना त्यासंदर्भात राज ठाकरेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.
सध्या महाराष्ट्रात राजू पाटील यांच्या रुपाने मनसेचा फक्त एकमेव आमदार आहे. पण म्हणून मनसेला जनाधार नाही, असं म्हणता येणार नाही. कारण सभेल जमणारी गर्दी त्यातून बरच काही स्पष्ट होतं. मनसेला मानणारा सुद्धा एक वर्ग आहे, भले तो अल्प असेल, पण तो आहे. म्हणूनच राज ठाकरे यांची दखल महायुतीला घ्यावी लागली. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे दिल्लीला गेले होते. तिथे त्यांनी भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. महायुतीमध्ये सहभागी होण्यासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये काय बोलणी झाली? ते अजून स्पष्ट झालेलं नाहीय. त्याची माहिती आज मिळू शकते.
अमित शहा यांच्या भेटीला विनोद तावडे त्यांना जातीने घेऊन गेले. तरीही राज यांनी त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. ते काय सांगतील त्यावर बरेच अवलंबून आहे. भाजपबद्दल त्यांनी काही बोलणे हे पक्षाला अडचणीत आणणारे ठरू शकेल. लोकसभेत भाजपच्या धोरणांना पाठिंबा दिला, विधानसभेत काही जागा मागितल्या तर पाठोपाठ येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मनसेचे काही कार्यकर्ते निवडून येण्याची शक्यता आहे.
