लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. यातच आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. नांदेडमध्ये आज अमित शाह यांची सभा होणार आहे. नांदेड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ नरसी गावात संध्याकाळी ५ वाजता या सभेचं आयोजन करण्यात आले आहे. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अशोक चव्हाण यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांची उपस्थिती राहणार आहे.
नांदेड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ नरसी गावात संध्याकाळी पाच वाजता सभेचं आयोजन करण्यात आले आहे. देशाच्या राजकारणात गेल्या दहा वर्षांत अमित शहा यांचे नाव सर्वाधिक चर्चेत राहिले.मागील लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये अमित शहा यांनी चाणक्याची भूमिका बजावली. या निवडणुकांमध्ये भाजपला चांगले यश मिळले. महाराष्ट्रातील निवडणुकीतही प्रचारात अमित शहा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर सभा घेऊन वातावरण निर्मिती केली होती.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं गृहमंत्री अमित शाह यांची जिल्ह्यात पहिलीच जाहीर सभा होत आहे. तसंच या सभेसाठी महायुतीचे अनेक नेते हजेरी लावणार आहेत. यामुळं जिल्ह्यातील भाजपा महायुतीच्या कार्यकत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाल्याची प्रतिक्रिया भाजपाचे सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली. विशेष म्हणजे नांदेड लोकसभेचे काँग्रेस उमेदवार वसंतराव चव्हाण यांचा तालुका असणाऱ्या नायगाव जवळील नरसी इथं या सभेचं आयोजन करण्यात आलंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यात काँग्रेसला गळती लागली आहे. आजच्या सभेत काँग्रेसचे काही नेते व कार्यकर्ते भाजपाच्या गळाला लागण्याची शक्यता आहे.
नांदेड व मराठवाडा काँग्रेसमुक्त करण्याची गॅरंटी चव्हाण यांच्याकडून घेण्यात आली आहे. याशिवाय प्रताप पाटील चिखलीकर यांना गेल्या निवडणुकीपेक्षा दुप्पट-तिप्पट मताधिक्याने निवडून आणण्याची जबाबदारी चव्हाण यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या प्रचार सभेच्या निमित्ताने अशोक चव्हाण मोठे शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.
