गुढी पाडव्याच्या दिवशी मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचे जाहीर केले. मात्र त्यांच्या या भूमिकेवरून अनेक जणांनी टीका केली. जे इतके दिवस मोदींच्या नावाने टीका करत होते ते आता त्यांनाच पाठिंबा देत आहे, असे विरोधकांनी म्हटले. मात्र ‘ मी माझी भूमिका बदलली नसून धोरणांवर कायम असल्याचे’ राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. आम्ही भूमिका बदलतो म्हणतात मात्र आमच्या भूमिका मुद्यावर आहेत. कावीळ झालेल्यांना सर्व जग पिवळं दिसतं असं म्हणत त्यांनी संजय राऊत यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं.
राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे की, गुडी पाडवा मेळाव्यात मी सांगितलं मनसेचा नरेंद्र मोदी यांना पाठिंबा आहे. पहिल्या पाच वर्षात आम्हाला त्यांचा भूमिका पटल्या नाहीत, तेव्हा टीका केली होती. टीका केली तेव्हा काय मागितलं नव्हतं, पूर्वीच्या मुद्यांवर टीका होती. महाराष्ट्राबाबतच्या मागण्या मोदींपर्यंत पोहचतील, आम्ही भूमिका बदलतो म्हणतात, पण आमच्या भूमिका या मुद्यांवर आहेत, असं स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी दिलं आहे.
राज ठाकरे म्हणाले की, मोदींच्या पंतप्रधानपदासाठी पाठिंबा दिला आहे. गेल्या पाच वर्षात राम मंदिर, कलम ३७० सारखे निर्णय घेतले गेले. पंतप्रधान मोदी नसते तर राम मंदिर उभा राहिलं नसतं. पंतप्रधान मोदी गुजरातचे आहेत त्यामुळे त्यांचं गुजरात प्रेम स्वाभाविक आहे. इतरही राज्यांकडे ते लक्ष देतील अशी अपेक्षा आहे. आता पुढे त्यांची पावले कशी पडतात हे पाहणं गरजेचं आहे.राम मंदिराचा विषय मोठा होता. आपल्याला धर्माच्या आधारावर राष्ट्र उभं करायचं नाही. पण १९९२ ते २०२४ पर्यंत रखडलेल्या गोष्टीबाबत सुप्रीम कोर्टाने आदेश दिला असला तरी पंतप्रधान मोदी नसते तर राम मंदिर उभं राहिलं नसतं. हा विषय तसाच राहून गेला असता, असे राज ठाकरे म्हणाले.
भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या तीन पक्षाच्या लोकांनी किंवा उमेदवारांनी आमच्या कोणत्या लोकांशी संपर्क साधायचा कुणाशी बोलायचं आणि पुढे कशाप्रकारचं जायचं त्याची यादी दोन दिवसात तयार होईल. त्यांच्यापर्यंत जाईल. आमचेही पदाधिकारी असतील त्यांना योग्य मानाने वागवतील अशी अपेक्षा आहे. कुणाशी संपर्क साधायचा याचा घोळ नको म्हणून यादी देऊ. त्यांनाही सोयीस्कर जाईल. पूर्णपणे सहकार्य करायचं आहे. पूर्ण प्रचार करायचा आहे. संपर्क साधल्यावरच प्रत्यक्ष काम सुरू होईल, असंही यावेळी राज ठाकरे म्हणाले.
