माढ्यासाठी देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये; नाराज उत्तम जानकरांना विशेष विमानाने मुंबईत पाचारण

माढा लोकसभा मतदारसंघातील नाराजी नाट्यातून ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या घराण्याने भाजपमधून बाहेर पडत थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करून धैर्यशील मोहिते-पाटील हे भाजपच्या विरोधात तगडे आव्हान दिले आहे. या पार्श्वभूमीवर मोहिते-पाटील यांनी हाती घेतलेले बेरजेचे राजकारण पाहता जागे झालेल्या भाजपने आता माढ्यात नुकसान नियंत्रण करण्यासाठी हातपाय हलवायला सुरूवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून पूर्वाश्रमीचे भाजपचे आणि आता मोहिते-पाटील यांना मैत्रीचा हात पुढे करण्यासाठी सरसावलेले उत्तम जानकर यांना विशेष विमान पाठवून मुंबईत पाचिरण केले आहे.

मोहिते-पाटलांच्या जाण्यामुळे माढ्यात होणारे नुकसान भरुन काढण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी डॅमेज कंट्रोल सुरु केल्याची माहिती समोर येत आहे. मोहिते-पाटील यांच्यासोबत उत्तमराव जानकर हेदेखील तुतारी हाती धरतील असे सांगितले जात होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी पडद्यामागून सूत्रे हलवत उत्तम जानकर यांना सागर बंगल्यावर बोलावून घेतले आहे.उत्तम जानकर यांना सागर बंगल्यापर्यंत पोहोचण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे.

मोहिते-पाटील यांच्यासोबत उत्तमराव जानकर हेदेखील तुतारी हाती धरतील, असे सांगितले जात होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी पडद्यामागून सूत्रे हलवत उत्तम जानकर यांना सागर बंगल्यावर बोलावून घेतले. त्यानंतर त्यांना थेट अमित शहा यांची भेट घालून देणार असल्याचेही समजते. यावर जानकर काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.

माळशिरसमध्ये जानकर यांना मानणारे सुमारे ६० ते ७० हजार मतदार असल्याचे यापूर्वी लढविलेल्या विधानसभा लढतींतून दिसून येते. जानकर यांनी लोकसभा निवडणुकीत मोहिते-पाटील यांना साथ दिल्यास भाजपचे मोठे नुकसान होऊ शकते. या पार्श्वभूमीवर अखेर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जागे होत उत्तम जानकर यांना मोहिते-पाटील यांच्या सोबत जाण्यासाठी रोखण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. त्याचाच भाग म्हणून फडणवीस यांनी जानकर यांना मुंबईत सागर बंगल्यावर भेटीसाठी पाचारण केले आहे.