लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने रविवारी संकल्पपत्र (जाहिरनामा) सादर केला. या संकल्प पत्रातील माहिती देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात पत्रकार परिषद झाली. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या संकल्पपत्रातील पंचसूत्रीबाबत माहिती दिली. काँग्रेससाठी जाहीरनामा कागद आहे. आमच्यासाठी मोदींची गॅरंटी आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. या वेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते. ते नागपुरात बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुढची पाच वर्ष 80 कोटी नागरिकांना रेशन मोफत देण्याचा संकल्प आहे. 70 वर्षावरील नागरीकांना युनिव्हर्सल मोफत उपचार देण्याचा निर्णय झाला आहे. तृतीयपंथींयाचाही आयुषमान भारतमध्ये समावेश करण्यात आला आहे. सिलेंडरची पद्धत्त कालबाह्य करुन पाईपने गॅस देण्याचा निर्धार आहे.एक कोटी घरांना सोलरची सयंत्र देऊन त्याचं विजेचं बील मोफत करणार आहे. मुद्रा योजनेत 60 टक्के महिलांना त्याचा लाभ मिळाला आहे.मुद्रा योजनेची मर्यादा 20 लाख करणार आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संविधान बदलण्याच्या मुद्दावर देखील भाष्य केलं. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान होते, म्हणून चहा विकणारा देशाचा पंतप्रधान झाला. जेव्हा मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा भारताच्या संविधानासमोर हात जोडून ते स्वीकारले. संविधान बदलण्याचा विचार आजपर्यंत कुणी केला नाही. संविधानातील मूळ गाभा बदलण्याचा अधिकार संसदेला नाही हे सुप्रीम कोर्टानेही सांगितले आहे. काँग्रेसकडे विश्वासार्हता नाही, कुठलाही विकासाचा मुद्दा नाही. त्यामुळे लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न काँग्रेस करतंय असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
ज्यावेळी विकासाचा विचार मांडता येत नाही. ज्यावेळी कुठलही जनहिताच कार्य करता येत नाही. विश्वासहर्ता संपलेली असते. अशावेळी लोकांच्या मनात कनफ्युजन निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. 2014, 2019 आणि आता 2024 मध्येही काँग्रेसचा तोच प्रयत्न आहे. पण लोकांचा विश्वास मोदींवर आहे. तीन राज्यात मोदींच्या बाजून कौल दिला. आता सुद्धा जनता मोदींच्या बाजूने मतदान करेल” असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून श्रीकांत शिंदेंच्या संस्थेत सामाजिक कार्याच्या नावाखाली आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोप केला आहे. यामध्ये चौकशी करण्याची मागणी राऊतांनी केली आहे. यासंदर्भात पत्रकारांनी देवेंद्र फडणवीसांना विचारणा केली असता त्यांनी राऊतांवर खोचक शब्दांत टीका केली. “कोण संजय राऊत? तुम्ही दर्जा असणाऱ्या लोकांबद्दल प्रश्न विचारा. माझा स्तर पाहून तरी प्रश्न विचारा”, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
