अभिनेता सलमान खानच्या घरावर रविवारी (१४ एप्रिलला) पहाटे गोळीबार झाला होता. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेकडून तपास सुरू होता. आता याप्रकरणी गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. या दोघांना गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. या आरोपींची ओळख पटवण्यात आली असून यासंदर्भात पोलिसांनी व्हिडीओही शेअर केला आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या टीमने आरोपींच्या मुसक्या गुजरातमधून आवळल्या आहेत. गोळीबार करुन गुजरामधील भुज जिल्ह्यात आरोपी पळाले होते. विकी साहब गुप्ता आणि सागर श्रीजोगेंद्र पाल अशी आरोपींची नावे आहेत. दोन्ही बिहारमधील रहिवाशी आहेत.
रविवार १४ एप्रिल रोजी अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील निवासस्थानी दोघांना गोळीबार केला होता. सलमानच्या गॅलॅक्सी अपार्टमेंटवर पहाटेच्या सुमारास गोळीबाराची घटना घडल्यानंतर खळबळ उडाली होती. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी तातडीने पावले उचलली. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच तपासासाठी २० पथके तयार केली होती. पोलीस तपासातून नवनवीन खुलासे समोर येत होते. दोघे आरोपींनी सलमान खानच्या घरावर चार गोळ्या झाडल्या होत्या.
हल्लेखोरांचा लॅारेन्स बिश्नोई गँगशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. काही हजार रुपयांसाठी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याची कबुली या दोघांनी चौकशीत दिली. गोळीबार करण्याआधी दोघांनी सलमान खानच्या घराची रेकी केली होती. पकडले जाऊ नये यासाठी त्यांनी मध्यरात्री देखील सलमान खानच्या घराची रेकी केली होती.
