देशात आजपासून लोकशाहीचा उत्सव; राज्यातील ५ तर देशातील १०२ जागांसाठी मतदान

लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानास आज प्रारंभ झाला.राज्यातील ५ तर देशभरातील १०२ जागांवर मतदानाला सुरुवात झाली. त्यात महाराष्ट्रातील पाच जागांचा समावेश आहे. राज्यातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या जागांवर मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात ८ केंद्रीय मंत्र्यांच्या जागांचा समावेश आहे. मोदी सरकारमधील मंत्री नितिन गडकरी, किरेन रिजिजू, सर्बानंद सोनोवाल, संजीव बालियान, जितेंद्र सिंह, भूपेन्द्र यादव, अर्जुन राम मेघवाल आणि एल मुरुगन यांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. तसेच दोन माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब (त्रिपुरा) आणि नबाम तुकी (अरुणाचल प्रदेश) यांच्या जागेवर मतदान होत आहे.

सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत मतदान होणार आहे. तर नक्षलग्रस्त भागात नक्षली कारवायांचा धोका लक्षात घेऊन गडचिरोली, चिमूर लोकसभा मतदारसंघातील आमगाव, आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी तसेच भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील अर्जुनी मोरगाव अशा पाच विधानसभा मतदारसंघात सकाळी सात ते दुपारी तीन या वेळेत मतदान पार पडेल.

पहिल्या टप्प्यात १,६२५ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये १,४९१ पुरुष आणि १३४ महिला उमेदवार आहेत. ८ केंद्रीय मंत्री, एक माजी मुख्यमंत्री आणि माजी राज्यपालही यावेळी रिंगणात आहेत. या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल रोजी होणार आहे. एकूण ७ टप्प्यात ५४३ जागांसाठी १ जून रोजी मतदान होणार आहे. सर्व जागांचे निकाल ४ जूनला लागणार आहेत.

महाराष्ट्रात रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपुरात निवडणूकीच्या धर्तीवर मतदान पार पडणार असून, त्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. गडकरी, विकास ठाकरे, मुनगंटीवार, धानोरकरांसह बड्या नेत्यांचं भवितव्य इथं मतपेटीत बंद होणार आहे. तर, पूर्व विदर्भातल्या लढाईत आज फडणवीस, पटोले, वडेट्टीवार, पटेलांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं पाहायला मिळणार असून, कोण बाजी मारणार याकडे साऱ्यांचंच लक्ष असेल.