लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडी वेगानं घडत आहेत. धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज धाराशिव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारसभेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सुनिल चव्हाण हाती कमळ घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये सुरु झालेला भूकंप अजून थांबत नाही. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी या दिग्गजांनी पक्ष सोडला. त्यानंतर अजूनही पक्षात उलटफेर सुरु आहे. आता धारशिव जिल्ह्यातून पक्षाला धक्का बसणार आहे.
धाराशिव मतदारसंघात सध्या वेगळेच वारे वाहताना दिसत आहे कारण परवाच राज्याचे माजी मंत्री आणि तुळजापूरचे माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापूरमध्ये भेट घेतली . देवेंद्र फडणवीस हे राम सातपूते आणि रणजितसिंह निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोलापूरात आले असता मधुकरराव चव्हाण यांनी माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या समवेत भेट घेतली. सुनिल चव्हाण हेच पक्षप्रवेश करणार असून मधुकरराव चव्हाण हे सध्यातरी प्रवेश करणार नाहीत अशी माहिती मिळत आहे. पुत्र पक्षप्रवेशाविषयीच चर्चा करण्यासाठी मधुकरराव चव्हाण आणि बसवराज पाटील यांनी फडणवीस यांची भेट घेतली.
मराठवाड्यातील ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र असलेल्या सुनील चव्हाण यांच्या प्रवेशामुळे महायुतीला फायदा होणार आहे. महायुतीने अर्चना पाटील यांना उमेदवारी दिलीय. त्यांचा अर्ज दाखल करण्यासाठी होणाऱ्या सभेत सुनील चव्हाण यांचा प्रवेश होईल. तुळजापूर तालुक्यासह धाराशिव जिल्ह्यात सुनील चव्हाण यांचा महायुतीला फायदा होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
