राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच राम मंदिराच्या बाबत एक वक्तव्य केले होते. ज्यात राम मंदिराबाबत सर्वजण बोलतायत, पण सीतेच्या मुर्तीबाबत का बोलत नाही, अशी नाराजी महिलांनी आपल्याकडे व्यक्त केल्याचे शरद पवारांनी म्हटले. आता यावरुन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिले आहे.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवारांवर निशाणा साधला आहे. बावनकुळे यांनी एक्सवर एक पोस्ट करत पवारांवर टीका केली आहे.”राम मंदिरात सीतामाईंची मूर्ती का नाही? असा जावईशोध शरद पवार यांनी लावला आहे. एरवी हेच पवार मंदिराच्या प्रश्नावर नाक मुरडत आपण नास्तिक असल्याची शेखी मिरवत असतात. शरद पवारांनी उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं करण्यापूर्वी राम मंदिराची थोडी माहिती घेतली असती तर बरं झालं असतं.
राम मंदिरात बालरूपातील रामलल्ला विराजमान आहेत पण पवारांना फक्त राजकारण करण्यात रस आहे. बरं जे शरद पवार निवडणुकीसाठी घरात आलेल्या सुनेला बाहेरची म्हणून हिणवतात त्यांना आज सीतामाईंबद्दल कळवळा येणं म्हणजे ढोंगीपणाचा कळसच म्हणावा लागेल,” अशी बोचरी टीका बावनकुळे यांनी शरद पवारांवर केली.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
राम मंदिराच्या मुद्द्याबाबत बोलताना शरद पवारांनी एका बैठकीतील प्रसंग सांगितला. यावेळी ते म्हणाले, एका बैठकीमध्ये माझ्यासमोर महिलांनी विषय काढला. त्यांनी माझ्याकडे तक्रार केली की, राम मंदिराबाबत सर्वजण बोलताय, सीतेच्या मुर्तीबाबत का बोलत नाही, असं महिला म्हणाल्याचं पवारांनी सांगितलं.
