नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांची माघार; उमेदवारी देऊ केल्याबद्दल मोदी, शहा यांचे मानले आभार

नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीत अजून तिढा कायम आहे. एकीकडे शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी या जागेसाठी जोर लावलाय तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांनी हे देखील या जागेसाठी आग्रही होते. आता छगन भुजबळ यांनी नाशिकच्या उमेदवारीतून माघार घेतली आहे.

नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, नाशिकच्या जागेसोबत अमित शाह यांच्यासोबत चर्चा झाली. अमित शाह यांनी नाशिकची जागा लढवण्याचे मला सांगितले. त्यावेळी ही जागा शिवसेनेकडे असल्याचे आम्ही सांगितले. त्यानंतर अमित शाह म्हणाले की, आम्ही एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत बोलू. त्यानंतर मी काम सुरु केले.देवेंद्र फडणविस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी बोलूनही मी माझ्या नावाची खातरजमा केली. पक्षाने जागा जाहीर करायला हवी होती. पण नंतर चर्चा सुरू झाल्या. नाशिकचा तिढा सुटलेला नाही. वेळ झाल्यास नुकसान होवू शकते. ताबोडतोब नाव जाहीर करायला हवे. समोरचा उमेदवार कामाला लागला आहे. मात्र, मी नाशिकच्या उमेदवारीवरून माघार घेतली आहे अशी घोषणा छगन भुजबळ यांनी केली.

महायुतीचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे आपण पूर्णपणे माघार घेत असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे. माझ्यावर विश्वास ठेवून माझे नाव, नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सुचवले त्या बद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मनापासून आभार मानत असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.उमेदवार जाहीर होण्यास उशीर होत आहे. त्याचे नुकसान देखील महायुतीला होऊ शकते. त्यामुळे ताबडतोब निर्णय जाहीर होणे आवश्यक आहे. कोणत्याही पक्षाला उमेदवारी द्या, मात्र, लवकर उमेदवारी जाहीर करा, असा सल्ला देखील छगन भुजबळ यांनी महायुतीला दिला आहे. हा संभ्रम लवकर दूर व्हायला पाहिजे, त्यामुळेच मी आज उमेदवार बाबतीत माघार घेतली असल्याचे छगन भुजबळ यांनी जाहीर केले.

भुजबळांनी माघार घेतल्यानंतर हेमंत गोडसेंनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हेमंत गोडसे म्हणाले, “केंद्रीय नेत्यांनी छगन भुजबळांच्या उमेदवारीबाबत आग्रह धरला होता. पण, वेळ कमी पडत असल्यानं लोकांपर्यंच पोहोचणं महत्वाचं होतं. भुजबळांनी माघार घेतल्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. हा तिढा सुटल्यानं महायुतीचा निर्णय अपेक्षित आहे. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीनं नाशिकबाबत निर्णय घेऊन उमेदवारी जाहीर करावी.”