ज्योती मेटेंची बीड लोकसभा निवडणुकीतून माघार; या कारणास्तव घेतला निर्णय

लोकसभा निवडणुकीतून शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांनी माघार घेतली आहे. बीड मतदारसंघात ज्योती मेटे या निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होत्या. पण आता ज्योती मेटे यांनी माघार घेण्याची निर्णय घेतला. ज्योती मेटे अपक्ष निवडणूक लढवणार का? त्यांनी निवडणूक लढवण्याचे ठरवल्यास कोणाला फटका बसणार याच्या चर्चा रंगल्या होत्या. ज्योती मेटे यांनी आता निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलंय. बीडमध्ये महायुतीकडून भाजपच्या पंकजा मुंडे यांना तिकिट देण्यात आलं आहे. तर पंकजा मुंडे यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे मैदानात आहेत.

मी बीड लोकसभेची उमेदवारी घ्यावी आणि निवडणूक लढवावी अशी जनभावना होती. त्यामुळे मी त्या दृष्टीने विचार केला, परंतु व्यापक समाजहित लक्षात घेऊन मी बीड लोकसभेच्या मैदानातून माघार घेत असल्याचे ज्योती मेटे यांनी स्पष्ट केले आहे. निवडणूक लढवावी असा जनतेचाच होरा होता. त्यामुळे मी त्या दृष्टीने चाचपणी केली तसेच उमेदवारी देखील मागितली होती. परंतु आता मी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असून, पुढील भूमिका लवकरच स्पष्ट करणार असल्याचे देखील ज्योती मेटे यांनी म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून ज्योती मेटे या अपक्ष उभ्या राहतील, अशी चर्चा सुरू झाली. यामध्ये अनेकांचा सूर असा होता की ज्योती मेटे या निवडणुकीमध्ये निवडून येतील. मात्र शिवसंग्राम पक्षाचे कोणतेही ठरत नसल्याने बीड जिल्ह्यात संभ्रमावस्था होती. यात स्पष्टपणे शिवसंग्रामची कोणतीही भूमिका कोणत्याही पत्रकार परिषदेमध्ये पाहायला मिळाली नाही. मात्र आजच्या पत्रकार परिषदेमध्ये ज्योती मेटे यांनी लोकसभा निवडणुकीतून मी माघार घेत आहे, असं जरी स्पष्ट केलं असलं तरी नेमकं या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसंग्रामचा नेमका कोणाला पाठिंबा असणार हे त्यांनी अस्पष्ट ठेवलं आहे.

मविआचा उमेदवार जाहिर होण्यापूर्वी त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपण निवडणूक लढविणार असा दावाही केला होता. परंतू मविआने उमेदवारी नाकारली. त्यानंतर त्या शांत होत्या. अखेर त्यांनी शनिवारी आपला निर्णय जाहिर केला. तसेच आगामी काळात कोणाला पाठिंबा द्यायचा किंवा नाही, हे प्रदेश कार्यकारिणीची बैठक घेऊन ठरवू, असेही त्या म्हणाल्या.