महायुतीच्या अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज अमरावतीत सभा आयोजित करण्यात आली. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी अमित शाह यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली.
तुम्ही कृषीमंत्री असताना आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांची माफी मागा, असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्याने शरद पवारांनी माफी मागितली. यावर अमित शाह यांनी शरद पवारांना लक्ष्य केलं आहे. तुम्ही 10 वर्ष कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केलं. विदर्भात शेतकऱ्यांनी तुमच्या कार्यकाळात आत्महत्या केल्या आहेत, त्यांच्या कुटुंबियांची माफी मागा, असं म्हणत अमित शाह यांनी शरद पवारांला सवाल विचारला आहे. अमरावतीमध्ये नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते.
”मी संसदेत ३७० रद्द करण्यासाठी विधेयक मांडत असताना राहुल गांधी मला म्हणाले, कलम ३७० हटवू नका. मी त्यांना विचारलं का, तर ते म्हणाले, असं केल्यास रक्तपात होऊ शकतो. मात्र आज पाच वर्षे झाली आणि काश्मीरमध्ये शांतता नांदत आहे. दगडफेक करण्याचे धाडसही कोणी केले नाही”, असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.
मोदींशिवाय काही कामे झालीच नसते असे म्हणत अयोध्येत राम मंदिर जे झाले ते मोदी यांच्यामुळे झाले. काँग्रेसने 70 वर्षे राम मंदिर होऊ दिले नाही. शिवसेनेचे नकली अध्यक्ष उध्दव ठाकरे हे सोनिया गांधी यांच्यामुळे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आले नाही.तब्येतीचे कारण पुढे करत शरद पवार हे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा करण्याच्या वेळी आले नाही. पवार इलेक्शन मध्ये कसे फिरत आहे, असा प्रश्न शाह यांनी उपस्थित केला. राहुल गांधी अमरावती कोणी ऐकले नाही. अयोध्यात दर्शन घ्या, मग लोक ऐकतील असे म्हणत राहुल गांधी यांना शाह यांनी अयोध्येचे निमंत्रण दिले. अयोध्येत न येणाऱ्या काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभु श्रीरामांचा अपमान केला. असा दावा अमित शाह यांनी केला.
राहुल गांधींची 26 पक्षांची खिचडी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
“ही निवडणूक साधी निवडणूक नाही. ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. हा देश कुणाच्या हाती द्यायचा, याचा फैसला करायची निवडणूक आहे. एकीकडे विश्वगौरव नरेंद्र मोदी आहेत, तर दुसरीकडे राहुल गांधी आहेत. फैसला तुम्हाला करायचा आहे. मोदींसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे, रामदास आठवले यांची रिपाईं आहे, कवाडे साहेबांचा पक्ष आहे, जानकरांची रासप आहे, राज ठाकरेंची मनसे आहे, वेगवेगळे पक्ष सोबत येऊन आपली महायुती आहे. त्या ठिकाणी राहुल गांधींची 26 पक्षांची खिचडी आहे”, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
