महाविकास आघाडीत बिघाडी? विखे पाटलांना पाठिंबा देणं भोवलं, ठाकरे गटाच्या माजी आमदारांचं पक्षातून निलंबन

ठाकरे गटाचे माजी आमदार विजय औटी यांच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अहमदनगर मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या विरूद्ध जाऊन महायुतीच्या सुजय विखेंना पाठिंबा देण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे. अहमदनगर दक्षिण शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी पारनेरचे माजी आमदार विजय औटी यांच्या निलंबनाचे पत्र काढले आहे.

आपली भूमिका मांडताना औटी म्हणाले होते की, पंधरा वर्षे आमदार असताना ज्या असंख्य कार्यकर्त्यांनी मला प्रेम दिलं, पाच वर्षांपूर्वी झालेल्या पराभवानंतरही आजपर्यंत ही माणसं माझ्याशी प्रामाणिक राहिली, त्या सर्वांना माझे आवाहन आहे की, सुजय विखे पाटलांचा सक्रिय प्रचार करा आणि पारनेर मधून मताधिक्कय देवून दहशतीचे राजकारण संपवा.

देशात लोकसभेच्या निवडणुका चालू असताना आपल्या अहमदनगर दक्षिण लोकसभेच्या मतदारसंघात देखील निवडणूक सुरू आहे. नगर मधील प्रमुख दोन्ही उमेदवार हे महायुतीचेच आहेत. त्यातील एकाने किती पलट्या मारल्या हे सर्वश्रुत आहे. मात्र, नगरमधून लोकसभेवर जाणारा उमेदवार हा देशाचं हित सांभाळणारा, देशाचं संरक्षण धोरण समजून घेणारा हवाय! प्रशासन आणि पोलिसांना अरे-कारे करणारा नकोय ! त्यांचा बाप काढणारा तर नकोच नको!

एकंदरीतच पारनेरच्या महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी फूट पडल्याचं पाहायला मिळालं. तर लंकेच्या बालेकिल्ल्यांमध्ये सुरूंग लागल्याचे देखील पाहायला मिळालं.माजी आमदार विजय औटी यांच्या या भूमिकेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पारनेर तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे, आघाडी प्रमुख प्रियंका खिलारी, युवासेना प्रमुख अनिल शेटे, नगर दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, संदेश कार्ले यांनी नगरमध्ये पत्रकार परिषद घेतली. विजय औटी यांचा हा निर्णय शिवसेना पदाधिकारी यांना मान्य नसल्याचे सांगितले. शिवसेना पदाधिकारी उद्धव ठाकरे यांचा निर्णय मान्य करतील. महाविकास आघाडी बरोबर कायम राहतील, असे सांगितले. भाजपने उद्धव ठाकरे यांना त्रास दिला आहे. शिवसेना पक्ष फोडला आहे. त्यामुळे आम्ही भाजपबरोबर जाणे शक्य नाही. दोन दिवसापूर्वी आम्ही भाजपविरोधात भांडाफोड आंदोलन केले आणि त्याच पक्षाच्या उमेदवारासाठी आम्ही मते कशी मागणार, असा प्रश्न डॉ. श्रीकांत पठारे यांनी उपस्थित केला.