एप्रिल महिन्यात तापमानात प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळाली, आता मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. मे महिना नागरिकांसाठी उष्णतेचा महिना असेल, असा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे. वाढत्या उष्णतेपासून काळजी घ्या, असं आवाहनही हवामान विभागाने केला आहे.
राज्यातील उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये उष्णतेची लाट कायम राहील. मुंबईमध्ये कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान हे 27 अंश सेल्सिअस इतके राहिल. कोकणात उष्ण आणि दमट असे वातावरण राहिल.एकीकडे उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून दुसरीकडे राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. विदर्भामध्ये सध्या कमाल आणि किमान तापमान सामान्य आहे. याठिकाणी उष्णतेची लाट देखील सामान्यच राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
राज्यातील हवामानाची स्थिती पाहता ठाणे, सिंधुदुर्ग, रायगड आणि सोलापूरात उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी या पार्श्वभूमीवर काळजी घेत उष्माघातापासून बचाव करण्यासाठी प्राथमिक उपाययोजनांचा अवलंब करावा असं आवाहन प्रशासकिय आरोग्य यंत्रणांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, पुढील 24 तासांमध्ये देशाच्या अरुणाचल प्रदेश आणि नजीकच्या भागांमध्ये अंशत: हिमवृष्टीची शक्यता असून, हिमालयाच्या पश्चिम क्षेत्रांमध्ये पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, अतीव पर्वतीय भागांमध्ये पुढील 5 दिवस वातावरणात सातत्यानं बदल अपेक्षित असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा चढत असून सोलापुरात राज्यातील सर्वाधिक तापमाची नोंद करण्यात आली आहे. सोलापुरचा पारा 44 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे, तर सोलापुरजवळील जेऊरमध्ये 44.5 अंश तापमानाची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे मुंबई आणि उपनगरातही तापमानात सातत्याने वाढ होत आहे. मुंबईचा पारा 34.1 अंशांवर गेला असून मुंबई उपनगराचे तापमान 38.4 अंश सेल्सिअसवर गेले आहे. त्यामुळे सध्या तरी राज्यातील तापमानाचा पारा कमी होण्याचे काही चिन्ह दिसत नाहीत आहेत. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उन्हाच्या झळा बसताना दिसत आहेत.
