टी-20 वर्ल्डकपवर दहशतवादाचं सावट; पाकिस्तानातून देण्यात आली धमकी

आयपीएल 2024 हंगामानंतर लगेचच 1 जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धा होणार आहे. यासाठी अनेक संघांनी आपल्या खेळाडूंची नावेही जाहीर केली असून स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. याचदरम्यान वेस्ट इंडिजला टी-20 विश्वचषकादरम्यान दहशतवादी हल्ला करण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

क्रिकबजनं प्रसिद्ध केलेल्या प्राथमिक वृत्तानुसार स्पर्धेचे सयआयोजक असणाऱ्या वेस्ट इंडिजला उत्तर पाकिस्तानातून ही धमकी आल्याचं सांगण्यात येत आहे. ज्यानंतर वेस्ट इंडिजमधील क्रिकेट वेस्ट इंडिजच्या वतीनं आपल्याकडून सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आल्याची हमी देण्यात आली आहे. ‘प्रो-इस्लामिक स्टेटनं टी20 वर्ल्डकप आणि तत्सम क्रीडाविषय आजोयनांविरोधात मोहिमा सुरु केल्या असून, त्याअंतर्गतच ही धमकी देण्यात आल्याचं कळत आहे. यामध्ये अफगाणिस्तान- पाकिस्तान शाखा, आयएसखोरासन च्या व्हिडीओ मेसेजचाही समावेश असून, त्या माध्यमातून अनेक देशांमधील हिंसाचारावर प्रकाश टाकण्यात आला आहे. इतकंच नव्हे तर या संघटनांकडून तत्सम कारवायांचं समर्थन करणाऱ्यांना युद्धात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

कॅरिबियन मीडियाने त्रिनिदादचे पंतप्रधान कीथ रॉली यांचा हवाला देत म्हटले आहे की, सामना पाहता कोणत्याही धोक्याचा सामना करण्यास सुरक्षा यंत्रणा सक्षम आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बार्बाडोसचे क्षेत्रीय सुरक्षा अधिकारी आयसीसी टी-20 विश्वचषकादरम्यान हल्ल्याचा इशारा दिल्यानंतर परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत. रिपोर्टनुसार, प्रो इस्लामिक स्टेटच्या नाशीर पाकिस्तान मीडिया ग्रुपकडून ही धमकी मिळाली आहे.

विश्वचषकासाठी पात्र ठरलेले संघ –
अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा.