नाशिकच्या जुना गंगापूर नाका येथील इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या(आयसीआयसीआय) होम फायनान्स या संस्थेच्या कार्यालयावर चोरांनी दरोडा टाकल्याची माहिती समोर येत आहेत. चोरट्यांनी 222 खातदेरांची लॉकर्स फोडून तब्बल 4 कोटी 92 लाख रुपयांचे सोने पळविल्यामुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, ही नाशिकमधील मोठी चोरीची घटना मानली जात आहे. चोरट्यांनी थोडेथोडके नव्हे तर तब्बल 222 खातेदारांची लॉकर्स फोडून त्यामधील दागिने लांबवले आहेत. या सोन्याच्या दागिन्यांची किंमत पाच कोटींच्या घरात आहे. शनिवारी संध्याकाळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. सध्या गुन्हे शाखा आणि पोलिसांकडून या चोरीप्रकरणाचा तपास सुरु आहे. या लॉकर्सच्या चाव्या मध्ये ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी वेगळाच संशय येत आहे. सीसीटीव्हीचा जागता पहारा आणि सिक्युरिटी तैनात असतानाही चोरट्यांनी आयसीआयसीआय होम फायनान्सच्या कार्यालयात शिरण्याचे धाडस कसे केले, याबाबत अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन दरोडेखोरांचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत. त्याआधारे आता सरकारवाडा पोलिसांनी दरोडेखोरांना शोधण्यासाठी युद्धपातळीवर तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे खासगी पतसंस्थांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
शनिवारी (दि.४) सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास शाखा व्यवस्थापक चंद्रकांत मुठेकर यांनी कार्यालय उघडून नियमितपणे कामकाजाला सुरूवात केली. गोल्ड लोन सर्व्हिस असोसिएट किरण जाधव हे कंपनीमध्ये काम करत असताना संध्याकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास एका ग्राहकाचे सोन्याचे दागिने कंपनीच्या सेफ्टी लॉकरमध्ये ठेवण्यासाठी गेले.
यावेळी त्यांच्याकडे असलेल्या एक किल्ली व क्रेडिट मॅनेजर सिद्धांत इकनकर यांच्याकडे असलेली दुसरी किल्लीने लॉकर उघडले. यावेळी हे लॉकर पुर्णपणे रिकामे असल्याचे त्यांना दिसताच पायाखालची वाळू सरकली. जाधव यांनी त्वरित क्रेडिट व्यवस्थापक रणजित देशमुख यांना माहिती कळविली. देशमुख यांनी प्रशासकीय व्यवस्थापक फिर्यादी जयेश कृष्णदास गुजराथी (३४,रा.पाथर्डीफाटा) यांना माहिती कळविली. त्यांनी कार्यालयात धाव घेत पाहणी केली असता लॉकर रिकामे असल्याचे दिसून आले. त्यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
