मनामध्ये असते तेच शरद पवार करतात, दाखवताना मात्र सामूहिक निर्णय दाखवतात; अजित पवार यांचा हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीने महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. शरद पवार यांनी देशातील प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, अशी भविष्यवाणी केली आहे. आमची आणि काँग्रेसची विचारसरणी सारखी असल्याचे त्यांनी म्हटले होते. आपण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मते घेऊन राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याबाबत निर्णय घेऊ, असे शरद पवार म्हणाले होते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवार मनामध्ये असते तेच करतात, परंतु दाखवताना तो सामूहिक निर्णय असल्याचे दाखवत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवार यांची आज पुण्यात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, भाजप बरोबर जाण्याची चर्चा झाल्याचं शरद पवार आता मान्य करत आहेत.भाजपसोबत सहा मिटिंग झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. भाजपबरोबर जायचं नव्हतं तर मिटिंग का झाल्या, असा सवाल यावेळी त्यांनी केला आहे.

पवार साहेबांना ज्यावेळी निर्णय घ्यायचा असतो, तेच बाकीच्या सहकाऱ्यांना सांगतात आणि असं दाखवतात की, तो सामूहिक निर्णय आहे. आम्ही जो निर्णय घेतला, तेव्हा ते एकटे त्या गोष्टीला विरोध करत होते. किंवा मध्येच म्हणायचे की, तुम्ही जा. मी आता बाजूला होतो. मी निवृत्त होतो, असं ते करायचे. ते त्यांना पाहिजे तेच करतात. फक्त दाखवताना हा सामूहिक निर्णय आहे, असं दाखवतात. परंतू त्यांच्या मनामध्ये जे असतं, तेच ते ठामपणे करतात, असे उत्तर अजित पवार यांनी दिले.

ठाकरे काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करतील असे वाटत नाही. मी अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून त्यांना पाहिले आहे. एकंदरीत ते असा काही निर्णय घेण्याची शक्यता नाहीच. शरद पवारांचा पराभव करणे हेच आमचे उदीष्ट आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी केलेले विधान चुकीचे आहे. त्यांची चूक झाली हे मी मान्य करतो. त्यानंतर आम्ही त्यांना सांगितले तुम्ही बारामतीत येऊ नका. आम्ही पाहतो. त्यानंतर त्यांच्याकडून असे वक्तव्य झाले नाही.