‘शिवतीर्थ’वरील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी-राज ठाकरे एकाच मंचावर

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये मनसेने भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला.राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात जाहीर पाठिंबा दिला होता. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडून आणण्याचे आवाहन केले होते. 17 मे रोजी मुंबईतील शिवाजी पार्कवर राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर येत आहे. महाविकास आघाडीवर जोरदार प्रहार होईल यात शंका नाही.

17 मे रोजी राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिवाजी पार्कवरील सभेत एकत्र दिसतील. त्यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. या सभेचं निमंत्रण, हिंदूत्वाचा अजेंडा आणि मराठी मतांचा टक्का यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. राज ठाकरे यांच्यामुळे मुंबई आणि परिसरात मराठी टक्का खेचून आणण्याचा प्रयत्न महायुती करणार आहे. मनसेने भाजपला निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा दिला आहे. मनसे महायुतीच्या प्रचार करत आहे. पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिकसह राज्यातील अनेक भागात मनसेचे कार्यकर्ते महायुतीच्या प्रचारासाठी सक्रिय झाल्याचे दिसून आले आहे.

मुंबईत महायुतीचा प्रचाराला वेग आला असून शिवाजी पार्क मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सभा घेण्यासाठी पालिकेच्या जी उत्तर विभागाकडे मनसेने 18 मार्च रोजी रितसर अर्ज केला होता. त्याच दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेही 18 मे च्या सभेसाठी जी उत्तर विभागाकडे अर्ज केला होता. पालिकेच्या जी उत्तर विभागाने दोघांचे अर्ज नगर विकास विभागाकडे मंजुरीसाठी पाठवले होते. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर मनसेला परवानगी देण्याबाबत 8 मे रोजी नगर विकास विभागाने पालिकेला कळवले. त्यानंतर 9 मे गुरुवारी पालिकेच्या जी उत्तर विभागाने मनसेला सभेसाठी मंजुरी दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज पार्कातील या सभेच्या नियोजनासाठी शिवसेना, भाजपा, मनसे, राष्ट्रवादी, आरपीआय आठवले गटाचे सर्व नेते आणि पदाधिकारी कंबर कसून कामाला लागले आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक रंजक घडामोडी पाहायला मिळत आहेत. त्यातच आता पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे राजकीय व्यासपीठावर येणार एकत्र येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत शिवतीर्थावर होणार सभा होणार आहे. मुंबईतील महायुतीच्या सहा लोकसभा उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची शिवतीर्थावर सभा होणार आहे. 18 मे रोजी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत, त्याआधी 17 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवतीर्थावर सभा घेणार आहेत.