इंडिया आघाडीच्या कुठल्याही नेत्याच्या संपर्कात राहू नका; एकनाथ शिंदेंकडून खासदारांना सूचना

लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यापासून महायुतीच्या पायाखालची वाळू सरकरली आहे. महायुतीतील सर्व पक्ष सतर्क आहेत. यावेळी भाजपला लोकसभे बहुमत मिळालं नाही. त्यामुळे भाजप आता मित्रपक्षांवर अवलंबून आहे.

एकीकडे एनडीएकडून सत्ता स्थापन करण्यासाठी वेगानं हालचाली सुरू आहे. या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या कुठल्याही नेत्याच्या संपर्कात न राहण्यासंदर्भात खासदारांना सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिल्या आहेत. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नवीन खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक झाली या बैठकीत या सूचना दिल्या आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ६, अजित पवार यांना फक्त १ जागा मिळाली. सत्तेसाठी केंद्रात भाजपला बहुमत मिळालं नाही. इंडिया आघाडीने जर घोडेबाजार केला. तर त्यांना देखील सत्ता स्थापनेची संधी आहे. त्यामुळे एनडीएतील सर्व खासदारांना सुचना देण्यात आल्या आहेत.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, खासदार प्रतापराव जाधव, खासदार संदीपान भुमरे, खासदार धैर्यशील माने, खासदार रवींद्र वायकर, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार संजय मंडलिक, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, आमदार संजय शिरसाट आणि शिवसेना सचिव संजय मोरे हेदेखील उपस्थित होते.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत गाठता आले नाही, पण त्यांनी मित्रपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान, आज एकीकडे राजधानी दिल्लीत एनडीएची बैठक झाली, तर दुसरीकडे इंडिया आघाडीनेही आपल्या मित्रपक्षांसोबत भविष्यातील रणनीतीवर चर्चा केली. या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. इंडिया आघाडी सध्या सरकार स्थापनेचा दावा करणार नसल्याचं मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं.