विशेष प्रतिनिधीनवी दिल्ली : पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार १९९९ साली एका मताने कोसळले होते. हे सरकार पाडण्यामागे आपलाच कसा हात होता ते एक मत आपणच कसे आणले होते अशी फुशारकी मारत आपल्या हुकलेल्या पंतप्रधापदाचा किस्सा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच सांगितला. (Sharad Pawar told stories from the fall of Vajpayee’s government to losing the post of Prime Minister.)पत्रकार निलेशकुमार कुलकर्णी लिखित ‘संसद भवन ते सेंट्रल विस्टा: आठवणींचा कर्तव्यपथ’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवार बोलत होते. शरद पवार म्हणाले की, “माझ्या विरोधी पक्षनेत्याच्या काळात एक घटना घडली. तेव्हा अटल बिहारी वाजपेयींचे सरकार होते आणि त्यांचे सरकार असताना आम्ही विरोधी पक्षात त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मांडला. तो ठराव एक मताने मंजूर झाला. ते जे एक मत होते ते मी मिळवले होते. कसे मिळवले ते मी सांगत नाही. ठराव मांडला, चर्चा झाली आणि मध्ये जी वेळ असते त्या वेळेत मी बाहेर गेलो. कुणाशीतरी बोललो आणि परत येऊन बसलो. त्यानंतर सत्ताधाऱ्यांमधील एका व्यक्तीने काही वेगळा निर्णय घेतला आणि एका मताने ते सरकार पडले. त्यावेळी विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी ही माझ्याकडे होती, हा इतिहास आहे.
आपल्या पंतप्रधानपदाचा किस्सा सांगताना शरद पवार म्हणाले, 1991मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली. तेव्हा सर्व चित्र बदलले. सगळ्यांनी बसवून ठरवले की, काही ज्येष्ठ नेत्यांनी निवडणुकीला उभे राहायचे. त्यात मीही होतो. पण माझी काहीच तयारी नव्हती. ती बैठक दिल्लीतच झाली होती. त्या बैठकीमध्ये पंतप्रधानपदाला, पक्षाचे नेतृत्व करायला दोन-तीन लोकांची नावे शॉर्टलिस्ट झाली होती. त्याच्यात माझे नावही होते. पण शेवटी निर्णय नरसिंह राव यांच्या बाजूने लागला. मला 158 मते मिळाली आणि नरसिंह राव यांना बहुदा 190 आणि काही अधिक मते मिळाली, असे त्यांनी स्पष्ट केले. नरसिंह राव पंतप्रधान झाले आणि त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात माझा समावेश करून संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली.
