जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो आणि भगिनींनो अशी भाषणाची सुरुवात करत ठाकरे म्हणाले, मी आता हे म्हटल्यावर उद्या पेपरमध्ये बातमी येणार उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. पण मी मागेही म्हटलं होतं. हिंदुत्व म्हणजे धोतर नाहीये सोडायला. गर्व से कहो हम हिंदू है ही घोषणा बाळासाहेब ठाकरेंनी दिली होती.पण मी म्हणतोय की अभिमानाने आणि स्वाभिमानाने म्हणा की मी मराठी आहे.
१९६६ मध्ये मराठी माणूस थकलेल्या मानसिकतेत होता. त्या काळोखात एक ठिणगी पडली त्याचा वणवा झाला ती ही शिवसेना. आज मराठी भाषा दिन आहे. काल महाशिवरात्र आहे, त्याआधी शिवजयंती झाली. आता गुढी पाडवा येणार. आपल्या फोनवर मेसेज येतील हॅपी गुढीपाडवा वगैरे. मला तर वाटतं आहे की शुभेच्छा मराठीत द्यायला पाहिजेत त्याची गरज आहे. या दिवशी कुसुमाग्रज यांच्या कविता आपण ऐकत असतो. मराठी भाषा गौरव दिन आपण उत्सवासारखा साजरा करतो. कुठेतरी एक चिंतेची किनारही लागली आहे. कारण गद्दारी करुन आपलं सरकार पाडल्यानंतर हमे मराठी नहीं आती हे आपल्याला ऐकून घ्यावं लागतं. असं जिथे ऐकू जाईल तिथे त्याच्या कानाखाली मराठीचा आवाज उमटला पाहिजे. महाराष्ट्र गीत वगैरे नुसतं ऐकत जायचं का आपण? ते वा वा करण्यासाठी नाही. त्या गाण्यात महाराष्ट्राचं वर्णन आहे त्याप्रमाणे वागा. तसं वागलो तर मराठी भाषेलाही आपला अभिमान वाटेल.
मी मुख्यमंत्री असताना राज्यात मराठी भाषेची सक्ती केली होती. महाराष्ट्रात आम्ही मराठी बोलणार. दुकानावर मराठी पाट्या हव्या हा कायदा मी मुख्यमंत्री असताना केला. पण सरकारच्या निर्णयाविरोधात एक कुणीतरी उपरा कोर्टात गेला ही हिमंत होतेच कशी? आम्ही हिंदू आहोत पण मराठीही आहोत. हम करे सो कायदा ते या दोघांचं चाललं आहे. मी गुजराती समाजाविरोधात नाही. पण त्या दोघांना मराठी आणि महाराष्ट्र खतम करायचा आहे. मुंबई ओरबाडायची आहे. उद्योगधंदे बाहेर न्यायचा आहे. मराठी माणसाच्या हातात भिकेचा कटोरा द्यायचा. पण तो कटोरा तोंडावर मारुन तुमच्यासमोर मराठी माणूस उभा राहिल असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. कुसुमाग्रज म्हणाले आहेत की “परभाषेतही व्हा पारंगत, ज्ञानसाधना करा तरी, माय मराठी मरते इकडे, परकीचे पद चेपू नका, भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे. गुलाम भाषिक होऊन आपल्या प्रगतीचे शीर कापू नका.” आपल्या भाषेत काही कमतरता नाही. अभिजात भाषेचा दर्जा द्यायला किती काचकूच केली होती. तुम्ही कोण अभिजात भाषेचा दर्जा देणारे? छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा मराठी होती. ते नसते तर तुम्हाला दिल्ली दिसली नसती असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
इतिहासात असं म्हटलं जायचं की मराठ्यांच्या घोड्यांच्या टापांच्या आवाजाने दिल्ली हादरायची. आत्ता जे दिल्लीत जातात त्यांची काय टाप आहे का? त्या टापांचा आवाज वेगळा आणि यांची टाप वेगळी, असाही टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
कुसुमाग्रज म्हणाले आहेत की “परभाषेतही व्हा पारंगत, ज्ञानसाधना करा तरी, माय मराठी मरते इकडे, परकीचे पद चेपू नका, भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे. गुलाम भाषिक होऊन आपल्या प्रगतीचे शीर कापू नका.” आपल्या भाषेत काही कमतरता नाही. अभिजात भाषेचा दर्जा द्यायला किती काचकूच केली होती. तुम्ही कोण अभिजात भाषेचा दर्जा देणारे? छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा मराठी होती. ते नसते तर तुम्हाला दिल्ली दिसली नसती असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
