विशेष प्रतिनिधी
मुंबई : समाजवादी पक्षाचे मानखुर्द – शिवाजी नगरचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाशी संबंधित केलेले वक्तव्य त्यांना चांगलेच भोवले आहे. विधान सभेत त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव भाजप आमदार आणि उच्च – तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला. हा प्रस्ताव सभागृहात एकमताने मंजूर झाला आहे. त्यामुळे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत सपा आमदार अबू आझमी यांचे निलंबन करण्यात आले आहे. हे निलंबन अधिवेशनापुरते असेल की पुढेही वाढवायचे याचा निर्णय घेण्यासाठी एक समिती देखील नेमण्यात आली आहे. (Lesson to Abu Aazmi from All-Party, suspended from the Legislative Assembly for his remarks on Aurangzeb)
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात औरंगजेबने त्याच्या कारकिर्दीत अनेक हिंदू मंदिरे बांधली. तो एक महान राजा होता. त्याच्या काळात भारत ‘सोने की चिड़िया’ होता. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, असे विधान केले आहे. आझमी यांच्या वक्तव्यावर संतापून आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला होता. विधान परिषदेत भाजपा गटनेते प्रवीण दरेकर आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अबू आझमी यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. अबू आझमी यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करत आहोत. त्यांना विधान भवन परिसरात येण्यास बंदी असेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
“फक्त अधिवेशन काळापुरते निलंबन नको. त्यांचे सर्व भत्ते बंद करा. आमदार निधी व पगार ही बंद करा. औरंगजेबाचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही. प्रस्तावात सुधारणा करा. कारवाई अधिक कठोर करा” अशी सुधीर मुनगंटीवार यांनी मागणी केली.
देशद्रोही पिलावळीला सच्चा मुसलमान देखील माफ करणार नाही. देशाभिमानी मुसलमानांशी आपला वाद आहे का? राष्ट्रभक्त मुसलमानांसोबत वाद आहे का? छत्रपती संभाजी महाराजांचा वध करणं, हलाल करून त्यांची चामडी सोलणं आणि त्यांच्यावर अन्याय, अत्याचार करणाऱ्या औरंग्याला चांगला माणूस म्हणणं, चांगला प्रशासक म्हणणं हे कितपत योग्य आहे? असे प्रश्नही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केले होते.
दोन्हीही सभागृहात अबू आझमी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. त्यांच्या या विधानानंतर अबू आझमींच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली होती. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अबू आझमी यांच्या निलंबनाची मागणी केली. त्यानंतर अबू आझमी यांनी एक व्हिडीओ शेअर करत केलेले विधान मागे घेत असल्याचे सांगितले.
