फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने ६ जून २०१५ रोजी कोस्टल रोड प्रकल्पासाठी नेदरलॅण्ड सरकारसोबत करार केला. कोस्टल रोडसाठी आवश्यक असणारी पर्यावरणपूरक संरचना आणि सागरी पायाभूत सुविधांमध्ये जगभरात नामांकित असणाऱ्या नेदरलॅण्डमधील कंपनीसोबत हा करार करण्यात आला.
देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात कोस्टल रोड प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाकडून तात्काळ मंजुरी मिळाली. मुंबई महानगरपालिकेने ८ जून २०१५ मध्ये या प्रकल्पाची व्यवहार्यता आणि प्रकल्पामुळे पर्यावरणावर होणारा परिणामांचा अभ्यास करण्यासाठी एसटीयूपी कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड आणि अर्न्स्ट अॅण्ड यंग या कंपन्यांची निवड केली.
महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीने (एमसीझेडएमए) कोस्टल रोड प्रकल्पाला ३० सप्टेंबर २०१६ च्या बैठकीत मान्यता दिली. कोस्टल प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाकडून ११ मे २०१७ रोजी अंतिम परवानगी मिळाली. कोस्टल रोड प्रकल्पाला केंद्र सरकारने त्वरित मान्यता दिल्याने फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री अनिल दवे यांचे आभार मानले.
महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेली कागदपत्रे आणि अहवालांच्या आधारावर न्यायालयाने १७ डिसेंबर २०१९ रोजी कोस्टल रोड प्रकल्पावरील स्थगिती उठवून, प्रकल्प सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र त्यानंतर आलेल्या ठाकरे – पवार सरकारच्या काळात काम पुन्हा ठप्प झाले. राज्यात सत्ताबदल होऊन देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर पुन्हा आपल्या ड्रीम प्रोजेक्टसाठी काम सुरू केले. १९ सप्टेंबर २०२२ रोजी कोस्टल रोडशी संबंधित प्रलंबित प्रश्नांवर बैठका घेऊन ते मार्गी लावले. कोळी समाजाच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे सहकार्यदेखील मिळवले. कोस्टल रोड प्रकल्पातील प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी, भुयारी मार्ग आणि भूमिगत बोगद्याचे काम ६२ टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले होते.
छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी, ११ मार्च २०२४ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्तपणे धर्मवीर स्वराजरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोडचे उद्घाटन केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेला आणि मुंबईच्या प्रगतीत एक मानबिंदू ठरणाऱ्या ‘मुंबई कोस्टल रोड’ प्रकल्पाचे लोकार्पण ११ मार्च २०२४ रोजी झाले. या मार्गावरील पहिल्या टप्प्यातील मरीन ड्राईव्ह ते वांद्रे-वरळी मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. मुंबईच्या पश्चिमी किनाऱ्याला लागून असलेल्या या प्रकल्पामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार असून पर्यावरण प्रदूषणाला आळा बसणार आहे. यामुळे जवळपास ३४ टक्के इंधनाची तर मुंबईकरांच्या ७० टक्के वेळेची बचत होणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा असे नामकरण करण्यात आले.
