विशेष प्रतिनिधी
भिवंडी : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने भिवंडीत पहिल्या शिव मंदिराचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. या मंदिराला तात्काळ तीर्थस्थळाचा दर्जा दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ( The first Chatrapati Shivaji Maharaj temple in Bhiwandi will be given the status of a pilgrimage site immediately, announced Chief Minister Devendra Fadnavis)
भिवंडी येथील शिवक्षेत्र मराडे पाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. ते म्हणाले, महाराजांचे आशीर्वाद घेण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. देव, देश आणि धर्मरक्षणासाठी ज्यांनी सर्वसामान्यांमध्ये प्राण ओतले आणि सर्वांच्या कल्याणासाठी रयतेचे राज्य निर्माण केले अशा युगपुरुषाला आपल्या, आराध्याला नमन करणे नवी ऊर्जा प्रदान करणारे होते. हे मंदिर सर्व शिवप्रेमींना स्वराज्याच्या जाज्वल्य मूल्यांप्रती सदैव जागृत राहण्यासाठी प्रेरित करत राहील हा विश्वास आहे.
आपण प्रभू श्रीरामांना युगपुरुष म्हणतो. प्रभू श्रीराम हे युगपुरुष का आहेत, प्रभू श्रीराम ईश्वर होते, मग रावणाशी लढण्यासाठी त्यांना सैन्याची आवश्यकता का होती? त्यांनी चमत्काराने रावणाला हरवायला पाहिजे होतं, पण ते युगपुरुष होते. त्यांना माहित होतं की, जो पर्यंत असुरी शक्तींना संपवण्यासाठी मी समाजाला जागृत करणार नाही, समाजातील कमजोर व्यक्तीच्या मनात शक्ती निर्माण करणार नाही. तोपर्यंत ते अधर्माशी लढणार नाही, म्हणून प्रभू श्रीरामांनी समाजातील छोट्यात-छोट्या व्यक्तीला एकत्र केलं. त्यांच्यात विश्वास निर्माण केला. छत्रपती शिवरायांनी देखील ठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित केलं. यात शेतकरी, बलुतेदार, यांना एकत्र केलं. त्यांच्यात पौरुषत्व निर्माण केले. आपल्याला देव, देश, धर्मकारिता लढायचे आहे. यासाठी तयार केले, हे जे बीजारोपण त्यांनी केलं. आपल्याला राजा, सिंहासनाकरता लढायच नाही तर, देव, देश धर्माकरता लढायचं आहे. हे मावळे असे लढले की, खानाच्या लाखांच्या फौजा यायच्या, पाच हजार मावळे त्या लाखांच्या फौजांना परास्त करायचे. हे बीजारोपण त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं, म्हणून ते युगपुरुष आहेत असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात गेल्यावर संकल्प केला पाहिजे. देव, देश आणि धर्मासाठी जी लढाई छत्रपती लढले. हिंदू म्हणून ठामपणे जगण्याची संधी आम्हाला दिली. त्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी मातीमध्ये असा अंगार फुलविला की औरंगजेबाला गाडल्याशिवाय मराठी थांबले नाहीत. संपूर्ण मोगली साम्राज्याचा निःपात केला. दिल्लीवरही झेंडा गाडणारे मराठे होते. एकोप्याने, सोबत राहणारा महाराष्ट्रात शिवरायांना अपेक्षित आहे. जातीधर्मामध्ये दुभंगलेला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित नाही.
या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती आहे. अयोध्येतील राम मंदिरातल्या प्रभू श्रीरामांची मूर्ती घडवणारे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी ही मूर्ती घडवली आहे. गडकिल्ल्यांच्या रचनेनुसारच या मंदिराची रचना असून एकूण अडीच हजार चौरस फुटांच्या परिसरात हे मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिरासाठी एकूण तटबंदी ही पाच हजार चौरस फूट इतक्या आकाराची आहे.
