विशेष प्रतिनिधी
विशेष प्रतिनिधी
मुंबई : बलात्काराचे प्रकरण आहे तर त्यात आदित्य ठाकरेंना वेगळा न्याय का? सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानुसार कोणावरही बलात्काराचा आरोप असेल तर सर्वात पहिले त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करावा लागतो. त्या नियमानुसार,आदित्य ठाकरेंना आणि ज्यांची नवे या प्रकरणात असतील त्यांना अटक करून चौकशी करावी, अशी मागणी मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी केले आहे. (Why should Aditya Thackeray be given different justice in the rape case? Nitesh Rane demands his arrest for questioning)
दिशा सालियनच्या वडिलांनी सामूहिक बलात्कार करुन दिशाची हत्या केल्याचा आरोप मुंबई हायकोर्टात केलेल्या याचिकेतून केला आहे. ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही या याचिकेत आरोप करण्यात आले होते.
यावर नितेश राणे म्हणाले, ही फार सरळ, सोपी केस आहे. दिशाची आत्महत्येची केस होती तर 8 जूनपासून ते आत्तापर्यंत पळापळी का चालली आहे, लपवालपवी का चालली आहे ? आदित्या ठाकरेंना यातून वाचवावं का लागतंय ? त्यांची जर काहीच इन्व्हॉल्व्हमेंट नसेल तर त्यांची मग एवढी पळापळ का सुरू आहे ?
आदित्य ठाकरे असतील, सूरज पंचोली असेल किंवा दिनो मोरिया असेल त्यांची चौकशी करावी, त्यांचा या केसमध्ये काहीच हात नसेल तर चौकशीमध्ये दूध का दूध पानी का पानी का पानी होईल, आम्हा सर्वांची थोबाडं बंद होऊन जातील, असे राणे म्हणाले. ही आत्महत्याच होती, या केसमध्ये काहीच नाहीये माझा हात, मला गोवण्यात येत आहे, असा विश्वास जर आदित्य ठाकरेंना असेल तर फार सरळ सोप आहे. त्यांनी चौकशीला सामोरं जावं, खरं काय ते सांगावं, पुरावे द्यावेत आणि आम्हाला सर्वांना खोटं ठरवावं असे आव्हान नितेश राणे यांनी दिले आहे.
संजय राऊत यांच्या आताच हे प्रकरण का काढले या आरोपावर उत्तर देताना राणे म्हणाले, महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांचे नाव केसमध्ये आलं होतं. त्यांनी किती मोठं प्रेशर टाकलं होतं, हे तुम्ही दिशा सालियानच्या वडिलांकडून ऐकावं. काहीही न बोलण्यासाठी, आमच्यावर फार मोठा दबाव होता, असं त्यांनी स्वत: सांगितले होते. किशोरी पेडणेकर त्यांच्या घरी का गेल्या होत्या मग ? याप्रकरणात आता सर्व राजकारण्यांनी बाजूला व्हायला पाहिजे, एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाला, तिची हत्या झाली. आता तिला न्याय मिळाला पाहिजे, आमचं एवढंच म्हणणं आहे, एवढीच भूमिका आहे.
राणे म्हणाले, दिशा सालियानच्या वडिलांचं राजकारणाशी काही घेणंदेणं नाही, त्यांनी एक भूमिका मांडली, ते कोर्टात गेले. अनेक लोकं या केसचा फॉलोअप घेत आहेत. कोर्टात तारखा पडत आहेत. आणि आता दिशा सालियानच्या वडिलांचा विश्वास बसला आहे की माझ्या मुलीने आत्महत्या केलेली नाही, त्याच्यात काहीतरी गडबड आहे, तिची हत्या झाली असं त्यांना वाटतंय. याप्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे.
