विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या घरी बसून राहण्याबाबत नेहमीच टीका होते. एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी तर घरबशा म्हणून त्यांची हेटाळणी करत असतात. आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी विधानमंडळामध्ये काम केलं तर त्यांना त्या विषयाचा अर्थ समजेल. पाच दहा मिनिटे हजेरी लावून काही समजणार नाही, असा खोचक सल्ला त्यांनी दिला आहे. (You wont understand anything by attending for five to ten minutesAjit Pawars harsh advice to Uddhav Thackeray)
कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना अजित पवार विधिमंडळ कामकाजाची माहिती दिली. ते म्हणाले, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे किती वेळ उपस्थित होते? कुठलाही प्रश्न त्यांनी मांडला नाही. विधीमंडळ अधिवेशन या काळात दररोज आम्ही 9 तास काम करत होतो . विरोधकांना कोणताच मुद्दा राहिलेला नाही. त्यामुळं ते मुद्दे काढत आहेत .
नवीन आलेल्यांना मान सन्मान देऊ, पण जुन्या नेत्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ, असे सांगून अजित पवार म्हणाले, आपला पक्ष सर्व जाती धर्माचा आहे. सरकारमध्ये असो वा विरोधी पक्षात, राजकीय नेत्यांनी सामाजिक तेढ निर्माण होऊ नये, यासाठी विधाने करताना काळजी घेतली पाहिजे. महाराष्ट्रात मोठ्या संख्येने मुस्लिम राहतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत देखील अनेक मुस्लिमांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही जाती किंवा पंथाच्या आधारावर कोणाशीही भेदभाव केला नाही.
लाडकी बहिणी आणि वीज माफीची योजना आम्ही बंद केली नाही. पुढची पाच वर्षे लाडकी बहीण योजना बंद करणार नाही माझी थोडी तारांबळ होतेय, पण मी मार्ग काढतोय. 2100 रुपये कधी द्यायचं याचा निर्णय मी योग्य वेळी घेईन असेही अजित पवार म्हणाले.
