विशेष प्रतिनिधी
पाली : राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या अधिकृत हेलिकॉप्टरला उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणांतच तांत्रिक बिघाड झाल्याने आपत्कालीन लँडिंग करावी लागली. 29 मार्च रोजी दुपारी 4:03 वाजता पाली येथील गर्ल्स कॉलेजच्या हेलिपॅडवरून हेलिकॉप्टर उड्डाण घेत असताना अचानक त्यातून दाट धूर निघू लागला आणि मोठा आवाज झाला. तत्काळ सतर्कता बाळगत पायलटने जमिनीवर यशस्वी उतरणी केली आणि मोठा अनर्थ टळला. ( Smoke and loud noise from Rajasthan Governors helicopter Pilot avoids major accident by taking precautions)
राज्यपाल बागडे यावेळी हेलिकॉप्टरमध्ये नव्हते. ते आधीच रस्त्याने पुढील कार्यक्रमासाठी सोनाणा खेतलाजी येथे रवाना झाले होते. त्यांना सोडल्यानंतर जयपूरकडे परतत असताना हेलिकॉप्टरमध्ये हा बिघाड झाला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, हेलिकॉप्टर अवघ्या 25-30 फूट उंच गेल्यावर त्यातून धूर येऊ लागला आणि आवाज ऐकू आला. हा प्रकार सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला असून, सरकारी हवाई वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
घटनेनंतर आपत्कालीन सेवा तत्काळ सक्रिय झाल्या. अग्निशमन दल आणि वैद्यकीय चमू घटनास्थळी दाखल झाले. खबरदारी म्हणून हेलिकॉप्टर ताडपत्रीने झाकण्यात आले असून, तांत्रिक तज्ञांनी तपासणी सुरू केली आहे. प्राथमिक अंदाजानुसार तांत्रिक बिघाड झाल्याचे दिसत असून, नेमके कारण जाणून घेण्यासाठी अधिकृत चौकशी सुरू आहे.
या घटनेनंतरही राज्यपाल बागडे यांनी नियोजित दौरा पुढे सुरू ठेवला. रणकपूर येथे रात्री मुक्काम केल्यानंतर त्यांनी पुढील दिवशी उदयपूरला प्रयाण केले. दरम्यान, सरकारी हेलिकॉप्टर्स आणि व्हीआयपी हवाई प्रवासाच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तांत्रिक चौकशी अहवाल येत्या काही दिवसांत प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
