विशेष प्रतिनिधी
नागपूर : “ देशात पैशाची कमी नाही, समस्या आहे ती प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांची,” असे स्पष्ट करत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग टोल संदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. येत्या १५ दिवसांत नवीन टोल पॉलिसी जाहीर केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ( Preparations for new toll policybig announcement in the next 15 days information from Nitin Gadkari)
वसंत व्याख्यानमालेमध्ये रस्ते विकास प्रकल्पांची माहिती देतानाच टोल व्यवस्था अधिक प्रभावी, पारदर्शक आणि प्रवाशांना सोयीस्कर बनवण्याचे संकेत गडकरी यांनी दिले. “पैशाची कमतरता नाही, माझं बजेट आधी २.८० लाख कोटी होतं, आता ते ३ लाख कोटींवर गेलंय. प्रश्न पैशाचा नाही, प्रश्न एवढे पैसे वेळेवर का खर्च होत नाहीत याचा आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
गडकरी यांनी पुढे सांगितले की, झोजिला बोगद्याचं काम कमी खर्चात पूर्ण केलं जात आहे. ज्याचं बजेट १२ हजार कोटी होतं, मात्र आम्ही ५५०० कोटीमध्ये हा रस्ता करणार आहोत, सहा हजार रुपये वाचवले. जवळपास सत्तर टक्के काम पूर्ण झाले आहे. मुंबई-गोवा तसेच दिल्ली-जयपूर महामार्ग लवकरच पूर्णत्वास जाईल. मुंबई गोवा रस्ता पूर्ण करताना खूप अडचणी आल्या, पण आता येणाऱ्या जूनपर्यंत हा रस्ता १०० टक्के पूर्ण होईल,
“देशात पाण्याची कमतरता नाही, नियोजनाची कमतरता आहे,” असं म्हणत त्यांनी देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये कार्यक्षम नियोजनाच्या गरजेवर भर दिला.
