उद्धव ठाकरे यांना संपविण्यासाठी सामनाचे अग्रलेख.. चंद्रशेखर बावनकुळे यांचा संजय राऊतांवर आरोप

विशेष प्रतिनिधी

मुंबई : सामना’तील अलीकडच्या काही दिवसांतील अग्रलेख हे उद्धव ठाकरे यांना राजकीय दृष्टया संपविण्यासाठी संजय राऊतांकडून लिहिले जात आहेत, अशी शंका खुद्द उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या माणसांकडूनच व्यक्त केली जात आहे, असा गौप्यस्फोट महसूल मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ( Samna Editorial are wriiten like this to end Uddhav Thackeray Chandrashekhar Bawankules allegations against Sanjay Raut)

महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र प्रतिगामी शक्तींच्या विळख्यात सापडला. ‘फुले’ चित्रपटास त्यातूनच विरोध सुरू आहे. महाराष्ट्रात ‘फुले-आंबेडकर विरुद्ध फडणवीस’ असा हा झगडा आहे, अशी टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून केली आहे. त्याचा जोरदार समाचार घेताना बावनकुळे म्हणाले, अकलेचा कांदा… म्हणजे कोण तर याचे उत्तर महाराष्ट्रातील जनतेला चांगलंच ठाऊक आहे. हो तेच बिनबुडाचे चंबू! रोज सकाळी उठून आपणच किती ग्रेट, थोर, विचारवंत आहोत असे भासवण्याचा ज्यांना ऊत येतो तेच ! ते कोण आहेत? हे महाराष्ट्राला ठाऊक आहे. आजही त्यांनी भांडण लावण्याचा केविलवाणा प्रयत्न महाराष्ट्रात केला. त्यांची कीव आली. सत्ता गेली की व्यक्ती किती अगतिक होतो, बरळू लागतो, आजूबाजूचे पिवळे दिसू लागते. महात्मा जोतिबा फुले यांच्यावरील चित्रपटावरून त्यांना मानसिक ऊत आला, त्यांनी गरळ ओकली. लोकनेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले. अर्थात, ज्यांनी आरोप केले त्यांना खरंतर बुडंच नाही. काय तर म्हणे, फुले विरुद्ध फडणवीस!!

फडणवीस मुख्यमंत्री असलेल्या महायुती सरकारने क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ द्यावे अशी शिफारस विधिमंडळात ठराव करून केंद्र सरकारला केली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना असे काही सुचले नाही आणि आता त्यांचे बगलबच्चे फुले विरुद्ध फडणवीस असा नवा शोध लावून बोंबलत सुटले, आहेत असा टोलाही त्यांनी मारला.

कधी काळी उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री होते, या गोष्टीवर विश्वास बसू नये, असाच त्यांचा सध्याचा वावर आहे, असे सांगून ते म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा निवडणुकीत खोटारड्यांवर आसूड ओढला. तरी अक्कल ठिकाणावर आली नाही. उद्धव ठाकरे यांना कळतच नाही की, नव्या महाभारतात झोपेचे सोंग घेतलेला संजय बिनकामाचा आहे. सर्व संपल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल, पण तेव्हा ते काहीच करू शकणार नाहीत.