विशेष प्रतिनिधी
मुंबई : जर दोन्ही नेते एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे. कारण कोणीही आपल्यातले मतभेद विसरून एकत्र येत असतील, तर यात वाईट वाटायचे काहीच कारण नाही. जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर उत्तम आहे. आम्ही स्वागत करू, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. ( We will be happy if both the leaders come together says Chief Minister Devendra Fadnavis)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्याबाबत वक्तव्य केलं आहे. मी सुद्धा भांडण बाजूला ठेवायला तयार आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मनसेसोबत युती करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे सध्या राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत चर्चा रंगली आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, मला वाटतं की, माध्यमं या गोष्टीचा जास्त विचार करत आहेत. त्यामुळे थोडी वाट बघा,
उद्धव ठाकरे यांनी घातलेल्या अटी-शर्तींसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, ऑफर देणार हे, रिसपॉण्ड करणारे ते, शर्ती ठेवणारे हे आणि सांगणारे ते, या विषयावर मी का बोलावं. त्यांना विचार याबद्दल. मला का विचारत आहात?
दरम्यान ठाकरे-मनसे युतीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, एखाद्या पक्षाच्या प्रमुखाला त्याच्या पक्षाची भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार असतो. त्यामुळे आम्ही त्याविषयी आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही. राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका घ्यावी. लोकसभा निवडणुकीवेळी राज ठाकरे आमच्यासोबत होते, पण विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी भाजपा किंवा महायुतीसोबत राहण्यास नापसंती दर्शवली. त्यावेळी त्यांनी तसा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता त्यांनी कोणता निर्णय घ्यायचा, हा राज ठाकरे यांचा अधिकार आहे. त्यांनी काय करावे, हा त्यांचा प्रश्न आहे.
ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीतत राज ठाकरे म्हणाले, कोणत्याही मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील वाद, भांडणं किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. मराठी माणसाच्या अस्तित्त्वासाठी या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत. एकत्र येणं, एकत्र राहणं यात फार कठीण गोष्ट वाटत नाही. विषय फक्त इच्छेचा आहे, कारण हा माझ्या एकट्याचा विषय नाही.
यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं की, “किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी तयार आहे. मी सर्व मराठी माणसांना महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याचं आवाहन करतो.” मात्र त्याचबरोबर त्यांनी एक ठाम अटही मांडली. “महाराष्ट्राच्या हिताच्या आड जो येईल, त्याचं मी स्वागत करणार नाही, त्याला घरी बोलवणार नाही, त्याच्यासोबत पंक्तीला बसणार नाही.”
