राज ठाकरेंबरोबर युतीचे बोलण्यापूर्वी बायकोची परवानगी घेतली का? नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील संभाव्य युतीच्या चर्चांवरून भाजप नेते आणि राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी रविवारी उद्धव ठाकरे यांच्यावर खरमरीत टीका केली. “राज ठाकरेंबरोबर पुन्हा एकत्र येण्यापूर्वी उद्धवजींनी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची परवानगी घेतली का?” असा खोचक सवाल त्यांनी केला.
( Did you take your wifes permission before talking about an alliance with Raj ThackerayNitesh Rane takes a dig at Uddhav Thackeray)

एका हिंदी न्यूज चॅनलच्या पॉडकास्टमध्ये बोलताना राणे म्हणाले, “अशा महत्त्वाच्या निर्णयांमध्ये रश्मी ठाकरेंचे मत अधिक प्रभावी ठरतं. त्यामुळे उद्धवजींनी काही निर्णय घेतल्यास तो रश्मीजींच्या संमतीशिवाय घेतला असेल का, हे विचारायला हवं.”

इतकंच नव्हे तर राणे यांनी असा दावाही केला की, “राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्यामागे रश्मी ठाकरेंचा मोठा हात होता. त्या वेळी या दोन चुलत भावांमध्ये फार मोठे मतभेदही नव्हते. राज ठाकरे यांना शिवसेनेतून बाहेर काढण्यासाठी रश्मी ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.

राज ठाकरे यांची जास्त अडचण रश्मी ठाकरे यांनाच होती. पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्याशी हातमिळवणी करायची असेल तर उद्धव ठाकरे यांना रश्मी ठाकरे यांची परवानगी घ्यावी लागेल. शिवसेना पक्षाला जे आतून ओळखतात ते माझ्या या मताला नाकारणार नाहीत, असा दावाही नितेश राणे यांनी केला.

गेल्या काही दिवसांत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही परस्पर मैत्रीची, एकत्र येण्याची सूचक वक्तव्ये केली आहेत. “महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवून एकत्र यायला हवं,” असा सूर दोघांनी दिला आहे. त्यामुळे या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. मात्र भाजपकडून या संभाव्य युतीला फारसं महत्त्व दिलं जात नसल्याचंही नितेश राणे यांनी स्पष्ट केलं. महायुतीला महाराष्ट्रात जनतेने भरघोस पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अशा युतींनी आमच्यावर काही परिणाम होणार नाही,” असे ते म्हणाले.