ठाणे : उद्धव ठाकरे हे आधुनिक दुर्योधन आहेत. त्यांनी गेल्या काही वर्षांत दुर्योधनासारखीच वागणूक दिली आहे. आता किती मस्का लावणार?” असा सवाल शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केला. ( Uddhav Thackeray is the ModernDay Duryodhan How Much More Buttering for Raj Questions Naresh Mhaske)
शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी आज ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला. ते म्हणाले “संजय राऊत आधी सिल्वर ओकला मस्का लावत होते. नंतर राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना मस्का लावत होते. मुंबई महापालिका ही मलिदा देणारी आहे, ती जिंकायची आहे. पण त्यांच्या गोटात गर्दी जमवणारा एकही नेता उरलेला नाही. म्हणून ठाकरे गट आता राज ठाकरेंना मस्का लावत आहे.
राज ठाकरे यांच्याविना आज उद्धव ठाकरेंना मोठी सभा घेणंही कठीण झालं आहे. “त्यांना आता पुन्हा राज ठाकरेंची गरज भासत आहे, हेच त्यांच्या नेतृत्वाच्या अपयशाचं लक्षण आहे, अशी टीका त्यांनी केली.
म्हस्के म्हणाले की, “संजय राऊत वारंवार राज ठाकरेंच्या घराला ‘रेस्टॉरंट’ म्हणतात. हे त्यांचं वैयक्तिक मत आहे की उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून ते बोलत आहेत? उद्धव ठाकरेंनी त्यांना सांगितलं आहे का की त्या घराला ‘कॅफे’ म्हणा?”
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरही राऊत यांनी शंका उपस्थित केल्याची आठवण करून देताना म्हस्के म्हणाले, “संजय राऊत म्हणाले की शरद पवार हे भेसळ आहेत. हे अत्यंत गंभीर विधान आहे. सुप्रिया सुळे यांनी यावर खुलं उत्तर द्यावं.
हिंदुत्वाच्या मुद्यावरही त्यांनी ठाकरे गटाला प्रश्न विचारले. “वक्फ सुधारणा कायद्याला विरोध करून कसल्या हिंदुत्वाच्या बाता करता? हे लोक फक्त स्वतःचा फायदा पाहतात. यांना ना हिंदुत्वाशी देणं-घेणं आहे, ना मराठी अस्मितेशी.”
म्हस्के यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. “आदित्य ठाकरेंसोबत फोटोसाठी कोण असतात? बॉलिवूडमधील अभिनेते. मग एखादा तरी मराठी अभिनेता दिसतो का त्यांच्या बरोबर? हेच दाखवतं की त्यांचा कल कुठे आहे,” असं ते म्हणाले.
संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील साद-प्रतिसाद सुरू झाला म्हणून पार्श्वभागातून जाळ बाहेर पडतोय असा व्हिडीओ पोस्ट केला. यावर पलटवार करताना म्हस्के म्हणाले, खरा धूर कुणाकडून निघतोय, हे जनतेला चांगलं माहित आहे.”
