विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासात नवा धक्कादायक तपशील समोर आला आहे. हल्ल्यातून थोडक्यात बचावलेल्या एका पर्यटकाने झिपलाइन ऑपरेटरवर थेट संशय व्यक्त केला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) तातडीने या ऑपरेटरला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. ( Zipline operator suspected in Pahalgam attack NIA takes him into custody for questioning)
या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता. हल्ल्यानंतर देशभरात संतापाचा उद्रेक झाला असून, सरकारकडून कठोर पावले उचलली जात आहेत.
हल्ल्यातून बचावलेले अहमदाबादचे पर्यटक ऋषी भट्ट यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक दावा केला. त्यांनी सांगितले की, बैसरन व्हॅलीमध्ये झिपलाइनचा आनंद घेत असतानाचा एक व्हिडिओ त्यांनी शूट केला होता. त्यावेळी झिपलाइन ऑपरेटरने “अल्लाह हू अकबर” असे तीन वेळा पुटपुटले आणि त्याच क्षणी खाली दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला.
“झिपलाइनसाठी माझ्या आधी नऊ लोक गेले. ऑपरेटरने त्यांना नेहमीप्रमाणे झिपलाइनवर सोडले. पण ज्या क्षणी माझा नंबर आला, तेव्हा त्याने अचानक ‘अल्लाह हू अकबर’ असे उच्चारले आणि त्यानंतरच गोळीबार सुरू झाला,” असे ऋषी भट्ट यांनी स्पष्ट केले.
त्यावेळी गोंधळात हे काहीसे दुर्लक्षित राहिले. मात्र, २३ एप्रिलला अहमदाबादला परतल्यानंतर, कुटुंबासोबत व्हिडीओ पाहताना हा धक्का देणारा प्रकार त्यांच्या लक्षात आला. “व्हिडीओ पाहिल्यावरच मला ऑपरेटरच्या वागणुकीतील अनैसर्गिकता लक्षात आली,” असे त्यांनी सांगितले.
ऋषी भट्ट यांच्या कुटुंबातील इतर सदस्यही त्या झिपलाइनचा अनुभव घेत असताना खाली उतरले होते. त्यानंतर हल्लेखोरांनी अचानक गोळीबार सुरू केला. त्यांच्या व्हिडीओमध्ये दहशतवाद्यांचा गोळीबार स्पष्टपणे टिपला गेला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
एनआयएने आता या झिपलाइन ऑपरेटरची सखोल चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक तपासात ऑपरेटरच्या हावभावावर संशय व्यक्त होत असून, त्याचे दहशतवाद्यांशी काही संबंध आहेत का, याचा तपास सुरु आहे. यापुढे झिपलाइन कंपनीच्या इतर कर्मचाऱ्यांशीही चौकशी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर सरकारने जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत केल्या असून, संवेदनशील पर्यटन स्थळांवर गस्त वाढवण्यात आली आहे.
