विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात औषध निर्मिती क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणार असून देशातील आघाडीची जैवतंत्रज्ञान कंपनी बायोकॉन लिमिटेड महाराष्ट्रात पुण्याजवळ इन्सुलिन निर्मिती प्रकल्प उभारण्यास इच्छुक आहे. कंपनीच्या या प्रस्तावाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत करत राज्य शासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही दिली आहे. ( Biocon to set up insulin project near Pune CM Fadnavis assures support)
मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सुरू असलेल्या ‘वेव्हज २०२५’ दृकश्राव्य मनोरंजन समिट दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस आणि बायोकॉन लिमिटेडच्या कार्यकारी अध्यक्षा किरण शॉ मुजुमदार यांच्यात विशेष बैठक झाली. यावेळी बायोकॉनने महाराष्ट्रात प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शवली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “बायोकॉनसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीकडून महाराष्ट्रात गुंतवणुकीची तयारी ही राज्यासाठी गौरवाची बाब आहे. औषध निर्मिती आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्र अग्रगण्य ठरणार आहे.” त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, बायोकॉन व्यवस्थापन समितीशी तत्काळ प्राथमिक चर्चा करून प्रक्रिया पुढे नेण्यात यावी.
बायोकॉन लवकरच जगातील आघाडीची इन्सुलिन उत्पादक कंपनी ठरणार आहे, असे सांगताना किरण शॉ मुजुमदार यांनी पुणे परिसरात उत्पादन प्रकल्प सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली. या प्रकल्पातून भविष्यात हजारो रोजगाराच्या संधी, जागतिक दर्जाची आरोग्य सेवा आणि ‘मेड इन इंडिया’ औषध निर्मितीस चालना मिळण्याची शक्यता आहे.
राज्यातील औद्योगिक, वैद्यकीय आणि औषध निर्मिती धोरणांमुळे महाराष्ट्र हे बायोकॉनसारख्या कंपन्यांसाठी सर्वोत्कृष्ट गुंतवणुकीचे ठिकाण ठरत असल्याचेही यावेळी स्पष्ट झाले.
